Published on
:
20 Nov 2024, 5:19 pm
Updated on
:
20 Nov 2024, 5:19 pm
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे दिसून आले. पुरुषांपेक्षा महिलांचा मतदान करण्याकडे कल होता. ५५.६६ टक्के पुरुषांनी मतदान केले तर महिलांनी त्यापुढेही जाऊन ५८.१ टक्के मतदान केले.
या मतदारसंघात प्रामुख्याने मनसेचे प्रमोद उर्फ राजू पाटील, शिवसेना उबाठाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्यात लढत होणार आहे. या तिन्ही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांमध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश केला होता. या महिला मतदार संघातील प्रत्येक गल्ली-बोळांमध्ये जाऊन आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत होत्या. शिवाय घरोघरी जाऊन पत्रके वाटण्यामध्ये महिलांचा पुढाकार सर्वाधिक होता. त्यामुळे प्रचार करणाऱ्या महिलांवर या मतदारसंघातील महिलांनी विश्वास ठेवल्याचे एकंदर आकडेवारीतून दिसून येते. बुधवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे या मतदारसंघाचा आमदार पुरूषांसह महिला मतदार ठरवणार असल्याचे स्पष्ट दिसून येते.
निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी बुधवारी रात्री कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. या मतदारसंघामध्ये एकूण ५ लाख १० हजार २४७ मतदार आहेत. त्यातील २ लाख ७५ हजार २८५ पुरुष, २ लाख ३४ हजार ८३२ महिला आणि १३० इतर मतदार आहेत. यापैकी १ लाख ५८ हजार ७४२ पुरुष, १ लाख ३६ हजार २२३ महिला आणि इतर १९, अशा एकूण २ लाख ९४ हजार ९८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी पाहता ५७.६६ टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. ५८.१ टक्के महिलांनी, तर १४.६२ टक्के इतरांनी मतदान केले. अशा एकूण ५७.८१ टक्के मतदारांनी मनसेचे राजू पाटील, उबाठाचे सुभाष भोईर आणि शिंदे गटाचे राजेश मोरे या तिन्ही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद केले आहे.