खडकपाडा पोलिसांकडून कल्याण-डोंबिवलीवर ड्रोनची करडी नजर(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
16 Nov 2024, 10:51 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:51 am
डोंबिवली : एकीकडे विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याने कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे.
ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण-डोंबिवलीतील 8 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अंतराळात गस्त घालण्यासाठी 40 ड्रोनची व्यवस्था केली आहे. अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचे कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा पोलिसांनी विविध भागांमध्ये शनिवारी (दि.16) टेस्ट रन केले.
येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे सार्वत्रिक मतदान होणार असून त्याला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारसंघांतील प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचला असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि आचारसंहिता निर्धोकपणे पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन देखिल सज्ज झाले आहे. राजकीय प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची विशेष दक्षता पोलिस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर गुंड, गुन्हेगार, समाजकंटकांवर जरब बसवण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येत आहे. त्यासोबतच आता ड्रोन कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही गस्त घालण्यासाठी मदत घेतली जात आहे. खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठी 5 ड्रोन कॅमेरे तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकपाडा परिसरात असलेल्या साई चौक, कैलाश पार्क, साई संकुलासह योगीधाम परिसरात गर्दीच्या ठिकाणचे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारी ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एकीकडे स्थानिक पोलिसांच्या जोडीला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही कल्याण परिमंडळात तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी 5 अशा 40 ड्रोन कॅमेऱ्यांच्या तिसऱ्या डोळ्याचीही मदत घेतली जात असून कोणतीही अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक घडामोड आता पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.