Published on
:
18 Nov 2024, 1:43 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:43 am
कसबा बावडा : केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार काम करत नाही तर फक्त धूर फेकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. या सरकारमध्ये कोल्हापूरला विशेष महत्त्व दिले जाईल, असा विश्वास राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आमदार सचिन पायलट यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या कसबा बावडा येथील शेवटच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पायलट म्हणाले, भाजप लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही, विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखे त्यांच्याकडे काही नसल्यामुळे सत्ताधारी बटेंगे तो कटेंगे असा नारा देत आहेत, त्यापेक्षा येणार्या पिढीला पढोगे तो बढोगे हा नारा महत्त्वाचा आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
आमदार सतेज पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याचे संस्कार महायुती सरकारने धुळीस मिळवले. सत्ताधारी विविध मार्गांनी आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. आजची कसबा बावडा येथील सभा होऊ नये यासाठी अनेकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण मी सभा येथेच घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असा इशारा दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
माझी समाजकारणातील, राजकारणातील सतेज मूर्ती घडवण्याचे काम कसबा बावडा लाईन बाजार वासीयांनी केले आहे. एका सामान्य नगरसेवकाला आमदार करून आपण सुज्ञ असल्याचे दाखवून देऊ, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. खासदार शाहू छत्रपती म्हणाले, यावेळच्या विधानसभा निवडणुकीत कसबा बावडावासीय माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य राजेश लाटकर यांना कसबा बावडा लाईन बाजारमधून देतील.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर सभेत बोलताना म्हणाले, पंधरा वर्षे सत्तेत असणार्यांनी कोणताही विकास केला नाही. हजारो कोटी आणल्याचे बोर्ड लागले.पण प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हाच महायुतीच्या उमेदवाराचा अजेंडा आहे. येणार्या 20 तारखेला 7 नंबरच्या नावापुढील बटण दाबून आपण मला विजयी करावे. सभेस डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सभेत भारती पवार, प्रशांत पाटील, हर्षल सुर्वे, आर. के. पोवार आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मोहन सालपे यांनी केले तर आभार आदित्य कांबळे यांनी मानले. यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, महिला, तरुण, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.