हिंदुस्थानात सर्वात जास्त आर्थिक फसवणूक ज्याद्वारे केली जाते, ती डिजिटल मोहीम कंबोडियातून चालत असल्याचे समोर आले आहे. ही सायबर फ्रॉड टोळी चिनी गुन्हेगार चालवत आहेत. या टोळीत 100 हिंदुस्थानींसह पाकिस्तान आणि नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. वसुलीनंतर आलेली 30 टक्के रक्कम ही कमिशननुसार वेगवेगळय़ा खात्यात पाठवली जाते. तर 70 टक्के रक्कम क्रिप्टोकरन्सीत परेदशात पाठवली जाते. उत्तर प्रदेशच्या एसटीएफने एका प्रकरणात 6 जणांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने पीजीआयच्या न्यूरोलॉजी विभागातील डॉक्टरला 2.81 कोटी रुपयांचा गंडा घातला होता. अटकेतील लोकांकडून लुटलेल्या पैशांची त्यांनी कशी ‘सोय’ लावली हे सांगितले. या टोळीने आतापर्यंत 500 बँक खात्यांचा वापर या पैशांची सोय लावण्यासाठी केला. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात डिजिटल अरेस्टची धमकी दाखवली जात आहे.
कंबोडियातून नवख्यांना लुटीचे प्रशिक्षण
लूट कशी करायची, पैसे कसे ट्रान्सफर करायचे, याचे प्रशिक्षण कंबोडियामध्ये नवख्या व्यक्तीला दिले जाते. सावजाला फसवण्यासाठी कस्टम, नार्कोटिक्स विभाग आणि सीबीआय अधिकाऱ्यांच्या रूपात बोलायचे. घाबरवण्याच्या आणि पैसे वसूल करण्याच्या पद्धती शिकवल्या जात असल्याचे समोर आले आहे.