Published on
:
23 Jan 2025, 5:44 am
Updated on
:
23 Jan 2025, 5:44 am
डोंबिवली : जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून झाडे लावा झाडे जगवाचा नारा लावला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षवल्लीची जपणूक केली जाते. मात्र सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृतांची नगरी म्हणून बिरूदावली लावणाऱ्या डोंबिवलीकरांमध्ये काही माथेफिरू देखिल दडले आहेत. या माथेफिरूंपैकी कुणीतरी वारंवार कचऱ्याच्या ढिागाऱ्यांना अशी लावतात. आजीची झळ पोहोचून झाडे मरू लागली आहेत. आता पोलिसांनी तर सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या माथेफिरूंना हुडकून त्यांचा लवकरच करेक्ट कार्यक्रम करण्याचा चंग बांधला आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा प्रचंड प्रमाणात वृक्षवल्ली आहे. आता याच वृक्षवल्लीला नजर लागली आहे. झाडांखाली गोळा करून ठेवलेल्या कचऱ्याला आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्याच्या कडेला जमा झालेला कचरा, झाडांचा पाला/पाचोळा व त्यात रहिवाशांनी आणून टाकलेल्या कचऱ्याला काही घनचक्कर आगी लावत असतात. परिणामी आगीची झळ पोहोचून झाडांना धोका निर्माण होत आहे. शिवाय कचऱ्यात प्लास्टिक असल्याने पेटल्यानंतर धूर निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. लागलेल्या आगी जवळच पथदिवे असल्याने एखादी दुर्घटना घडू शकते. एकंदर अशा आगीमुळे होत असलेले झाडांचे नुकसान आणि प्लास्टिक ज्वलनातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या घटनांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी केली आहे. रस्त्यावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांत कैद झालेल्या हालचाली तपासल्या असता कचरा जाळणारे महाभाग सापडू शकतील, असाही विश्वास नलावडे यांनी व्यक्त केला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिलापनगर तलावाजवळ एका पथदिव्याचा खांब आणि पिंपळाच्या झाडाजवळ जमा झालेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्याला अज्ञातांनी आग लावली. या आगीमुळे पिंपळाचा झाडाला या आगीची झळ बसली. काही दिवसांपूर्वी श्रीगणेश मंदिर खत प्रकल्पाजवळ जमा करून ठेवलेल्या कचऱ्याला अशीच आग लावल्याने काही झाडे जळाली होती. या घटनेचा अद्याप पंचनामा देखिल करण्यात आला नाही. परिणामी आगी लावणाऱ्यांचे मनोधैर्य वाढत चालल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांतून दिसून येते. त्यामुळे पोलिसांनी अशा आगी लावणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी सीसीटिव्ही फुटेजचा आधार घेतला आहे. एखाद्या दिवशी हाती लागल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांसह पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली आहे.