तुमच्या वाहनांचा त्रास आम्हाला का ?

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

10 Oct 2024, 7:01 am

Updated on

10 Oct 2024, 7:01 am

नितीन वाबळे

घोरपडी आणि कोरेगाव पार्क परिसरात अनेक ठिकाणी पार्किंग न ठेवता इमारती आणि घरांची बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची दुचाकी व चारचाकी वाहने अंतर्गत गल्लीबोळात व मुख्य रस्त्यांच्या बाजूला पार्क केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, वाहतुकीस रस्ते अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

महापालिकेकडून बांधकामास परवानगी घेताना पार्किंगसाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. मात्र, घोरपडी व कोरेगाव पार्क येथे अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करून पार्किंगसाठी जागा सोडली न गेल्याने संबंधितांची वाहने इमारतीच्या बाहेर असलेल्या रस्त्यांवर किंवा मुख्य रस्त्यांच्या बाजूला पार्क केली जात आहेत. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचे वाहन पोहचण्यासाठी अडथळा होत आहे. यामुळे ’तुमच्या वाहनांचा आम्हाला का त्रास?’ असा सवाल रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग करणार्‍यांना नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 1 ते 7 या ठीकाणी काही हॉटेलला पार्किंगची सोय नाही. ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने मुख्य रस्त्यांवरच उभी करतात.

कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 1 ते 7 मधील अनेक हॉटेलना पार्किंगची व्यवस्था नसल्याने येथे येणारी दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर पार्क केली जातात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वर्दळीसाठी अडथळा होतो. यावर कारवाईविषयी महापालिकेचा बांधकाम विभाग व वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यांच्याकडून याची दखल घेतली जात नाही.

रवींद्र कवडे, सामाजिक कार्यकर्ते, कोरेगाव पार्क

कोरेगाव पार्क येथील हॉटेलच्या बाहेरील अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर आम्ही सातत्याने कारवाई करीत आहोत. ही बांधकामे पुन्हा झाली असतील, तर त्या ठिकाणी पुन्हा कारवाई केली जाईल.

शांतीलाल कोळेकर, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

रेल्वे उड्डाणपुलाखाली रात्रंदिवस पार्किंग

घोरपडी येथील थोपटे चौकामध्ये नव्याने तयार झालेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. काही नागरिकांच्या घरांच्या ठिकाणी पार्किंगची सोय नसल्याने त्यांची वाहने रात्रंदिवस येथे पार्क केली जात आहेत. त्यामुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article