थंडीची चाहूल:अंडे 72 वरून 84 रुपये डझन!, हिवाळ्यात तब्येतीला पोषक म्हणून खाद्यप्रेमींकडून अंड्यांना विशेष पसंती
2 hours ago
1
थंडीची चाहूल लागताच वाढलेल्या मागणीमुळे खाद्यप्रेमींकडून मांसाहाराबरोबर अंड्यांनाही विशेष पसंती दिली जात आहे. त्यामुळे, दिवाळीनंतर गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात अंड्यांची मागणी वाढली आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागांतून व परराज्यातून देखील आवक होत आहे. शहरासह जिल्ह्यात दिवसाकाठी ४ ते ५ लाख अंड्यांची मागणी आहे. दरातही प्रति नग एक रुपयाने वाढ झाली आहे. यामुळे डझनच्या भावातदेखील वाढ झाली असली असून, आधी ७२ रुपये डझनाने मिळणारे अंडे आता ८४ रुपये डझन झाल्याने एका अंड्यासाठी ग्राहकाला आता ७ रुपये मोजावे लागत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, चातुर्मास या काळात अंड्यांची मागणी कमी होते. हिवाळ्यात तब्येतीला पोषक म्हणून अंड्यांचा खुराक अनेकजण सुरू करतात. त्यामुळे अंड्यांना नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मागणी वाढते. यंदा तर नोव्हेंबरच्या पंधरवड्यातच अंड्यांची मागणी दुप्पट वाढली आहे. सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातीलच एक खाद्य म्हणजे अंडी. मात्र, ती आता हळूहळू महाग होऊ लागली आहेत. हिवाळ्यात आपल्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि उबदारपणाची गरज असते. अशा परिस्थितीत, अंडी हे एक सुपरफूड आहे जे आपल्या शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. कारण त्यात प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा समतोल साधला जातो. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी रोज अंडी खाणे खूप फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात. पण एक प्रश्न नक्कीच पडतो की रोज किती अंडी खावीत? तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दररोज १ ते २ अंडी खावीत. एका अंड्यातून सुमारे ७० कॅलरीज मिळतात जे शरीराला उबदार ठेवण्यासाठी पुरेसे असते. रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हैदराबादहून आवक सुरू मागणी वाढली की अंड्यांच्या दरात वाढ होते. तशी ती यंदाही झाली आहे. सध्या हैदराबादमधून चांगली आवक सुरू आहे. दर गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत सारखेच आहेत. सध्या निवडणुकीची धामधूम असल्याने निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणारे कार्यकर्तेही अंड्यांवर ताव मारत आहेत. त्यामुळे घाऊक प्रमाणात अंडयांची मागणी वाढली आहे. - हिरालाल ललवाणी, अंडी विक्रेता, अकोला
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)