Published on
:
24 Nov 2024, 1:47 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:47 am
राशिवडे : राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा सर्वसामान्य जनतेशी असणारा जनसंपर्क, विकासकामांचा डोंगर आणि जनतेसाठी नेहमीच उपलब्ध असणारा सर्वमान्य आमदार म्हणून ख्याती आहे. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयामध्ये राधानगरी तालुक्याने गतपंचवार्षिक निवडणुकीपेक्षा तिप्पटीने म्हणजे 19,167 मताधिक्य दिले. आजरा जि. प. ने मताधिक्य घटविण्याचा प्रयत्न केला असला, तरी भुदरगडने नेहमी भरभरून मते दिली. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना राजकीय चिंतनासह आत्मचिंतन करावे लागणार आहे.
गेली दहा वर्षे थेट जनतेशी असणारा संपर्क, पक्षविरहीत कामे, गाव, वाड्यांवर पोहोचलेला विकास यामुळे सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून साधेपणाने वावरणारा आमदार म्हणून थेटच जनतेच्या हृदयामध्ये घुसल्याने हा विजय सहज, फरकाने झाला. गेल्या अडीच वर्षांमध्ये गाव, वाडी आणखी घर तिथेपर्यंत रस्ता, पाणी, वीज, आरोग्य सेवा पोहोचविण्याचे काम आमदार आबिटकर यांनी केले होते. सहज उपलब्ध होणारा आमदार, सर्वपक्षीयांशी असणारा नित्य संपर्क विजयासाठी सुकर ठरला. महाविकासच्या के. पी. पाटील यांना अपेक्षित जि.प. मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही.
पोस्टल मतांमध्येही आबिटकर यांनी मताधिक्य घेतले. लाडक्या बहिणींनीही मताधिक्यांमध्ये मोठा हातभार लावल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मविआचे के. पी. पाटील यांनी निवडणुकीत जिंकणारच म्हणून केलेली राजकीय हवा ही हवाच ठरली, तर अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांनी घेतलेली मतेही आबिटकरांना विजयापासून रोखू शकली नाही. महाविकासचे के. पी. पाटील व अपक्ष उमेदवार ए. वाय. पाटील यांच्या राजकीय यंत्रणाही फोल ठरल्या. त्यामुळे आबिटकरांनी विजयी हॅट्ट्रिक करत सामान्य जनतेचे पाठबळ सार्थक करून दाखविले.