Published on
:
24 Nov 2024, 1:47 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:47 am
कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत महायुतीतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी 1 लाख 47 हजार 993 मते घेऊन विद्यमान आ. ऋतुराज पाटील यांचा 18 हजार 337 मतांनी पराभव केला. आ. ऋतुराज पाटील यांना 1 लाख 29 हजार 656 मतांवर समाधान मानावे लागले.
या मतदारसंघात बसपाचे सुरेश आठवले, स्वाभिमानी पक्षाचे अरुण सोनवणे, राष्ट्रीय समाज पार्टीचे विशाल सरगर, रिपब्लिकन पाटील ऑफ इंडिया (ए) चे विश्वास तराटे यांच्यासह अपक्ष म्हणून गिरीश पाटील, माधुरी कांबळे, अॅड. यश हेगडे-पाटील, वसंत पाटील, सागर कुंभार हे देखील निवडणूक रिंगणात होते. ताराराणी विद्यापीठातील व्ही. टी. पाटील सभागृहात मतमोजणी झाली. सकाळी साडेसात वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या केंद्रास भेट देऊन सूचना दिल्या. आठ वाजता टपाली मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी हरीश धार्मिक यांनी कर्मचार्यांना गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर टपाली मतदान एकत्रित करण्यात आले. सैनिकांच्या मतपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ झाला.
पहिल्या फेरीत महाडिक यांनी 747 मतांची आघाडी घेताच कार्यकर्त्यांंनी जल्लोष सुरू केला. दुसर्या फेरीतही महाडिक यांनी 1991 चे मताधिक्य घेतले. तिसर्या फेरीत मताधिक्य 505 राहिले. चौथ्या फेरीत 1247, पाचव्या फेरीत 1681, सहाव्या फेरीत 2188 मतांची तर सातव्या फेरीत पुन्हा महाडिकांचे मताधिक्य घसरून 113 वर पोहोचले.
आठव्या फेरीत ऋतुराज यांची आघाडी
पहिल्या सात फेर्यात मागे पडलेल्या ऋतुराज पाटील यांनी आठव्या फेरीत 184 मतांची आघाडी घेतली. यावेळी ऋतुराज समर्थकांंच्या चेहर्यावर हास्य फुलले. मात्र, नवव्या फेरीत पुन्हा महाडिक यांनी 2123 जादा मते घेतली. दहाव्या फेरीत महाडिक यांचे मताधिक्य 1806 मतांची आघाडी कायम राहिली. पुन्हा ऋतुराज पाटील यांनी अकराव्या फेरीत महाडिक यांचे मताधिक्य तोडून 561 मतांची आघाडी घेतली. मात्र एकूण मताधिक्यांत महाडिक आघाडीवर राहिले. बाराव्या फेरीत महाडिक यांनी 752 मतांची आघाडी घेतली. तेराव्या फेरीत 1989 तर चौदाव्या फेरीत 1181, पंधराव्या फेरीत 915 , सोळाव्या फेरीत 2776 आणि सतराव्या फेरीत 2242 मताधिक्य घेऊन आघाडी कायम ठेवली. अठराव्या फेरीत महाडिक यांंचे मताधिक्य घटले; मात्र 240 मतांची आघाडी राहिली. 19 व्या फेरीत 110 मतांची आघाडी घेतली.
ऋतुराज पाटील यांनी 20 व्या फेरीत 598, 21 व्या फेरीत 1,646 तर 22 व्या फेरीत 1,316 मतांची आघाडी घेतली. तरी महाडिक यांचे एकूण मताधिक्य कायम राहिले. शेवटच्या टप्प्यात काही फेर्यात आघाडी घेणार्या ऋतुराज पाटील यांची विजयाकडे जाण्याची धडपड कुचकामी ठरली. आठव्या फेरीपासून निकाल स्पष्ट दिसू लागल्याने महाडिकांच्या कार्यकर्त्यांंनी जल्लोष सुरू केला; तर ऋतुराज पाटील यांचे कार्यकर्ते मतदान केंद्रातून हळूहळू बाहेर पडू लागले. अपक्षांसह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनीही काढता पाय घेतला.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात पुरुष - 187400, महिला 185233 व इतर 51 अशा एकूण 372684 मतदारांपैकी पुरुष 142707 (76.15टक्के), महिला 139007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 2,81,743 (75.60 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निरीक्षक म्हणून अशोक कुमार यांनी तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरीश धार्मिक यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्निल रावडे व विजय यादव, शशिकांत पाटील यांनी काम केले.
टपाली मतदानात ऋतुराज यांना आघाडी
टपाली मतदानात मात्र ऋतुराज पाटील यांनी बाजी मारली. त्यांना 1606 मते, तर अमल महाडिक यांना 899 मते पडली. 2 हजार 718 टपाली मतदानापैकी 2556 मते वैध तर 162 मते अवैध ठरली.
दोन यंत्रांत बिघाडामुळे व्हीव्हीपॅटची तपासणी
मतदान यंत्र क्रमांक 8 आणि 149 मधील मतदानाची आकडेवारी मिळण्यात तांत्रिक अडचण आल्याने या यंत्रातील व्हीव्हीपॅटची मोजणी केली. तर मतदान यंत्र क्रमांक 48, 137, 139, 212 आणि 260 या पाच व्हीव्हीपॅट मशिनवरील चिठ्ठ्यांंची मोजणी करण्यात आली.
9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
या मतदारसंघातून 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी केवळ दोन उमेदवारांनाच डिपॉझिट वाचवता आली. उर्वरित 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.