Published on
:
18 Nov 2024, 1:06 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:06 am
सांगली : आर. आर. पाटील, माजी गृहमंत्री. ओळख मात्र आर. आर. आबा अशीच. ग्रामविकाससारखे तुलनेत दुर्लक्षित खाते. या खात्याचे ते मंत्री झाले आणि त्यांच्यासह खातेही झळाळून निघाले. महाराष्ट्रातील लोकप्रिय नेतृत्व. कामामुळे, भाषेमुळे बातमीत सतत झळकणारे. त्यांचा मतदारसंघ तासगाव-कवठेमहांकाळ, जि. सांगली. आबांचा हा मतदारसंघ आता मात्र ठरलाय लक्षवेधी. आता त्यांचा मुलगा रोहित लढतोय, वय वर्षे 26. विरोधात उभे ठाकलेत माजी खासदार संजय पाटील, वय साठ. त्यांचा सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. ते सलग दहा वर्षे खासदार होते. धडाडीचे पैलवान. त्यांचे पूर्वापार राजकीय विरोधक आर. आर. आबा. राजकीय ‘तंटामुक्ती’च्या मांडणीत आबांनी शरद पवार यांना सांगून त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. आमदारकीची मुदत संपताच त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये ते भाजपच्या छावणीतून मोदी लाटेत खासदार झाले. अगदी 2019 मध्येही. पण, 2024 मध्ये पराभूत झाल्यानंतर ते आता विधानसभेचे दार ठोठावताहेत.
या मतदारसंघात ‘घड्याळ’ जिंकत आल्याचा इतिहास आहे. आता हे ‘घड्याळ’ अजित पवार यांच्या पक्षाकडे आहे. त्यांनी संजय पाटील यांना ‘कमळ’ सोडून हाती ‘घड्याळ’ बांधायला लावले आहे. त्यांचाही हा घरचा मतदारसंघ. त्यांचीही येथे ताकद आहे. आमदार आणि खासदारकीचा त्यांचा अनुभव ‘दांडगा’ आहे. भाषणही दणक्यात असते. सत्ताधारी महायुतीची शक्तिशाली ताकद त्यांच्या मागे आहे. राज्य, राष्ट्रीय नेते त्यांच्या प्रचारात उतरलेत. काकांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई ठरलीय!
या मतदारसंघात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचा गट आहे. ‘सरकार’ अशी त्यांची ओळख. गावोगावी विशेषतः कवठेमहांकाळ तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी विशाल पाटील यांना खासदार होण्यासाठी मदत केली. मात्र, आता ते संजय पाटील यांना विधानसभेत पाठविण्यासाठी झटताहेत. त्यांच्या मतांच्या ‘अबंडा’मुळे काय होते, ही उत्कंठाही या मतदारसंघातील लढतीला ‘लक्षवेधी’ करण्याचे एक कारण.
...यांच्या हाती आहे भविष्य
एकूण मतदान ः तीन लाख 12 हजार 686
पुरुष मतदार ः 1 लाख 59 हजार 76
महिला मतदार ः 1 लाख 53 हजार 606
इतर ः 4