Published on
:
18 Nov 2024, 1:36 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:36 pm
नवी दिल्ली : पुढील वर्षी २०२५ मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आपली मतपेटी मजबूत करण्याच्या प्रयत्न करत आहेत. नेत्यांचे पक्षांतर सुरु झाले आहे. भाजपने आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आपल्यासोबत घ्यायला सुरुवात केली आहे. तर काँग्रेसमधील नेते आम आदमी पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचवेळी भाजप आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये बाजूला पडलेल्या नेत्यांना काँग्रेस लक्ष्य करत आहे.
दिल्लीच्या सीमावर्ती भागातील जाट मतदारांवर सर्व पक्षांच्या नजरा खिळल्या आहेत. या मतपेटीचा फायदा घेण्यासाठी भाजपने केजरीवाल यांच्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री कैलाश गेहलोत यांचा पक्षात समावेश करून मोठा धक्का दिला आहे. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि जाट मतांचे विभाजन रोखण्यासाठी, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रघुविंदर शौकीन यांची मुख्यमंत्री आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील रिक्त पदावर मंत्री म्हणून नियुक्ती केली. तसेच नजफगडमधील काँग्रेसचे माजी आमदार सुमेश शौकीन यांना पक्षात समाविष्ट केल्याने झालेले नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
काँग्रेसचे माजी आमदार सुमेश शौकीन यांनी 'आप'मध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे कौतुक केले. शौकीन म्हणाले की, 'आप'ने दिल्लीच्या ग्रामीण भागासाठी खूप काम केले आहे. दिल्लीच्या आप सरकारने ग्रामीण भागांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम केले आहे. कैलाश गेहलोत यांच्या विरोधात सुमेश शौकीन यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जात आहे. शौकीनपूर्वी काँग्रेसचे तीन वेळा आमदार वीरसिंग धिंगन आणि चौधरी मतीन अहमद यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. मतीन अहमद काँग्रेसच्या तिकिटावर 5 वेळा आमदार झाले आहेत.
दिल्लीत इंडिया आघाडीत बिघाड
दिल्ली विधानसभा निवडणुका जसजशी जवळ येत आहेत तसतशी लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेली इंडिया आघाडी पूर्णपणे तुटलेली दिसत आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेस वेगळे झाले आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार करत आहेत. दोन्ही बाजूंनी नेते फोडण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र, या शर्यतीत काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान होत आहे. गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. दिल्लीतील काँग्रेसची अवस्था पाहून त्यांचे नेते पक्ष सोडण्यात आघाडीवर आहेत.