दिव्य मराठी मुलाखत:अजित पवारांना ‘बटेंगे तो कटेंगे’चा अर्थ कळला नाही- फडणवीस, उद्धवसेनेच्या पहिल्या यादीत आमच्याकडून गेलेल्या 17 जणांचा समावेश

6 days ago 2
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला अजित पवारांनी विरोध केला आहे. मात्र, त्यांना या घोषणेचा अर्थच बहुधा कळला नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी लाडकी बहीण, मराठवाड्यात जरांगे फॅक्टर आदी प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. प्रश्न : मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा युतीला कितपत धोका वाटतोय? फडणवीस : जरांगेंनी नुकतीच घोषणा केली आहे की, ते निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे कुणाला फायदा होईल आणि कुणाचे नुकसान होईल याचा अंदाज लावता येत नाही. मात्र महायुतीला फायदा होऊ नये म्हणून जरांगेंनी उमेदवार दिला नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. प्रश्न : बटेंगे ते कटेंगेशी अजित पवार सहमत नाहीत. त्याबद्दल काय? फडणवीस : बहुधा अजित पवारांना ‘बटेंगे तो कटेंगे’ चा अर्थ कळला नाही असे मला वाटते. या देशाचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा भारतीय समाज जात, भाषा, प्रांत या आधारावर विभागले गेले, तेव्हा तेव्हा परकीय आक्रमकांनी आपल्यावर राज्य केले आहे. असे झाल्यावर देश कापला जातो, समाजही कापला जातो आणि जनताही कापली जाते. आता ओबीसीतील विविध जाती वेगळ्या झाल्या तर ओबीसी समाजाचे महत्त्व कमी होईल. एसटी समाजाच्या ५४ जातींत फूट पडली, तर त्यांना महत्त्व राहणार नाही. त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे’ याचा अर्थ सर्व जातींनी एकसंध राहिले पाहिजे, असा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असे म्हटले आहे. लोकसभेला काँग्रेस -मविआने व्होट जिहादचा प्रयोग केला. त्याचा त्यांना धुळ्यासह अमरावती, उत्तर मध्य, ईशान्य मुंबईत फायदा मिळाला. भाजपविरोधात मत दिले नाही तर ‘अल्ला के साथ धोखा होगा’ असे मशिदींवर बॅनर लावण्यात आले. ही धर्मनिरपेक्षता आहे का? त्यामुळे ‘बटेंगे तो कटेंगे ही एक प्रकारे नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. मी इथे स्पष्ट करू इच्छितो की आम्ही (भाजप) मुस्लिमांच्या विरोधात नाही. जेव्हा आम्ही ‘लाडकी बहीण योजना’ लागू केली, तेव्हा मुस्लिम भगिनींनाही त्याचा लाभ मिळत आहे. प्रश्न : तुम्ही मुख्यमंत्री असताना कर्जमाफी, मोफत मदतीला विरोध करत होता. मग आता लाडकी बहीणचे काय? फडणवीस : लाडकी बहीण योजनेला आम्ही अर्थसंकल्पातून मदत देणार आहोत. पण मविआ तर या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत असे म्हणत होते. मात्र त्यांनी स्वत:हून अधिक रक्कम देण्याची घोषणा केली आहे. प्रश्न : भाजपने मित्रपक्षांना उमेदवार का दिले आहेत? फडणवीस : महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनाच नव्हे तर सर्वच पक्षांना आम्ही उमेदवार दिले आहेत. उद्धवसेनेच्या पहिल्या यादीत आमच्या १७ उमेदवारांचा समावेश होता. कारण त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती. प्रश्न : लाल संविधानाचा मुद्दा बूमरँग झालाय का? फडणवीस : होय, १००% बूमरँग झाला आहे. काँग्रेसने आणलेला हा लाल संविधानाचा मुद्दा लॅटिन अमेरिकेतून चोरलेला आहे. नागपुरात त्यांनी दाखवलेल्या लाल संविधानात कोरे कागद होते. यापेक्षा मोठा राज्यघटनेचा अपमान काय असू शकतो? प्रश्न : या निवडणुकीत प्रचाराचा स्तर का घसरला आहे? फडणवीस : सदाभाऊ खोतांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. पण उद्धव ठाकरे, नाना पटोले दररोज सकाळी आमच्याबद्दल जे बोलतात त्याचे काय? सदाभाऊ खोत हा गरीब कुटुंबातील मुलगा असल्याने त्यांना टार्गेट करण्यात आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article