दिव्य मराठी सेलिब्रिटी टॉक:कितीही पक्षांचे सरकार असो ...अजिबात लाथाळ्या न करता टिकवावे
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिव्य मराठीने प्रख्यात अभिनेते गिरीश ओक आणि भारत गणेशपुरे यांनाही त्यांच्या सरकारकडून अपेक्षा विचारल्या. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मागील वेळी आम्ही ज्या अपेक्षेने मतदान केले आणि जे घडले त्यातून विश्वासार्हतेला धक्का बसला. आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये. कितीही पक्षांचे सरकार येवो ... ते निदान त्या पक्षांनी एकत्र राहून टिकवावे. सरकारने लोकांना कर्तव्य, जबाबदारीची जाणीव करून द्यावी आज शेतीसाठी मजूर मिळत नाही. शेतमालकाला ट्रक वा ट्रॅक्टर घेऊन शेतमजुरांच्या दारी जावे लागते. आजही रस्ते, पाणी आणि विजेचे प्रश्न सुटलेले नाहीत. येणाऱ्या सरकारने ही परिस्थिती बदलली पाहिजे. राज्यात कोणाचेही आणि कितीही पक्षांचे सरकार येवो, एकदा सरकार स्थापन झाले की लाथाळ्या न करता ते टिकवावे. सकल राज्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठीच काम केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही आपल्याला मतदान करा, असे आवाहन करावे लागते हे आपले दुर्दैव आहे असे वाटते. हा आपला देश आहे, इमानदारीने मतदान करणे ही देशसेवा आहे ही भावना खोलवर रुजलीच नाही. सारेच राजकारणी स्वत:ला शेतकऱ्यांची मुले म्हणतात. पण, मुले इतकी कर्तबगार असताना बापाची स्थिती बिकट आणि दयनीय आहे याचे वाईट वाटते. शेतमालाला भाव मिळत नाही. शेतमालाचा लिलाव होतो. पण, त्यावर व्हॅल्यू अॅडेड करून निर्मित वस्तूंचा लिलाव होऊ शकत नाही. कृषिप्रधान देशात शेतकरी भिकारीच आहे. गावातील पोरांना गावात पोरी मिळत नाही. शेती केवळ स्टेटससाठी हवी आहे. दुसरे म्हणजे सरकारने नियमित रोजगार कसा मिळेल हे पाहिले पाहिजे. आजही निवडणुका जात, धार्मिक ध्रुवीकरण आणि भावनिक मुद्द्यांवर होतात. त्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजेत. पूर्वी इतिहास ६० मार्क आणि नागरिकशास्त्राचा पेपर ४० मार्काचा राहत असे. नवीन अभ्यासक्रमात नागरिकशास्त्राचा पेपरच १०० मार्काचा हवा. सरकारने लोकांना आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. भारत गणेशपुरे, ख्यातनाम अभिनेते नेत्यांनी किमान टीव्हीवर तरी कुख्यात गुंडासारखे बोलू नये सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालले आहे ते निराश करणारे आहे. प्रसिद्धी माध्यमात बोलताना राजकारणी नेत्यांनी सभ्य आणि सुसंस्कृतपणाच्या सर्व मर्यादा गुंडाळून ठेवल्या आहेत. आता राजकारण्यांनी गमावलेली विश्वासार्हता मिळवावी आणि निदान सभ्यतेने वागावे एवढीच अपेक्षा आहे. स्थापन होणारे सरकार टिकून राहावे. मागील वेळेला आम्ही एक अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून मतदान केले. मनात एक विश्वास होता. त्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. कलावंत, कलाकार लोकप्रिय असतात म्हणून दरवर्षी आमच्याकडून मतदान करण्याचे आवाहन रेकाॅर्ड करून घेतात. पण या वेळेस लोकांना कशाच्या भरवशावर मतदान करा हे सांगायचे? एकेकाळी महाराष्ट्राचे नाव संपूर्ण देशात अभिमानास्पद होते. आज परिस्थिती तशी नाही. कोणी, कोणाशी, काेणाच्या विचारांशी प्रतारणा केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. सामान्यांना राज्याची प्रगती हवी आहे. मतदानाचे आवाहन रेकाॅर्ड करताना एक कलावंत म्हणून आमच्या अपेक्षांचाही विचार व्हायला पाहिजे. संपूर्ण देशभर एक देश, एक शिक्षण पद्धती हवी. पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही. कला प्रांताची आता सरकारकडून अशी अपेक्षा आहे की, नाट्यगृह बांधताना नियोजन, देखभालीची पश्चात व्यवस्था हवी, सरकारकडे ए, बी. सी असे ५००, ८०० व १२०० प्रेक्षक क्षमतेचे आराखडे हवे. सरकार कोणत्याही आणि कितीही पक्षांचे येवो, पण ते नीट टिकवावे. सर्व सरकारी खात्यांनी त्यांना नेमून दिलेले काम नीट आणि प्रामाणिकपणे काम करावे. लोकप्रतिनिधींनी सभ्यपणे वागावे. टीव्हीवर बोलताना नेत्यांनी आपण कुख्यात गुंड असल्यासारखे बोलू नये, अशीही अपेक्षा आहे. गिरीश ओक, ख्यातनाम अभिनेते
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)