दिव्य मराठी हवा कुणाची:उत्तर महाराष्ट्रात श्रेष्ठींची अपेक्षा 41 ची, महायुतीला मिळू शकतात 28 जागा
2 hours ago
1
मनोज जरांगेंनी छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांना पराभूत करण्याचा विडा उचलला असल्यामुळे आणि शरद पवार यांनीही त्यांनाच लक्ष्य केल्यामुळे तिकडे सर्वांचे लक्ष आहेच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा प्रभाव किती पडेल हीदेखील चर्चा सुरू झाली आहे. महायुतीला उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४१ जागा मिळाव्यात अशी भाजप श्रेष्ठींची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात महायुतीला २८ ते ३०, मविआला १५ ते १७ जागा मिळतील, अशी शक्यता आहे. इंदिरा गांधी पराभूत होऊ शकतात, तर गिरीश महाजन यांचे काय घेऊन बसलाय? एक वयस्क शेतकरी सांगत होता. तिकडे येवल्यात छगन भुजबळही पडल्याशिवाय राहणार नाही, असाही त्यांचा दावा होता. अर्थात, मनोज जरांगेंवर त्यांचा प्रचंड विश्वास. महाजनांच्या विरोधातील शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपेंना काही मतदार वर्गणी करून पैसे देत आहेत, हे वास्तवही आहेच. त्यात दोन्ही मतदारसंघांत शरद पवारांच्या सभा झाल्या आहेत आणि त्यांनीही या दोघांना पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे या बाबांचा विश्वास दुणावला आहे. त्या दोघांचे कार्यकर्ते मात्र आमचे नेते पराभूत होऊच शकत नाहीत हाच विश्वास व्यक्त करीत आहेत. थोड्याफार फरकाने उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांत काहीसे असेच वातावरण आहे.
लोकसभेसारखेच वातावरण आताही आहे, असे सांगणारे भेटतात. त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळतील, असे त्यांना वाटते आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. हवा बरीचशी उजवीकडे वाहताना दिसू लागली आहे. त्यामुळे ४७ पैकी ४० जागा महायुतीला मिळाल्या पाहिजेत हे श्रेष्ठींचे स्वप्न पूर्ण होणार नसले तरी २८ ते ३० जागांपर्यंत महायुती पोहोचू शकते. १-२ अपक्ष निवडून येण्याची शक्यता गृहीत धरली तर उर्वरित १५ ते १७ जागा मविआच्या पदरात पडू शकतात. राेहिणी खडसे, राधाकृष्ण विखे, रोहित पवार अशा काही अटीतटीच्या लढती आहेत. लोकसभेला हिंदू मतांचे विभाजन किंबहुना मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाने धुळ्यात मविआचा उमेदवार विजयी झाला होता. आता तसे होऊ नये म्हणून धुळ्यात थेट पंतप्रधान मोदी येऊन गेले. त्यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा धुळ्यात दिला. पण अचानक उद्धवसेनेची उमेदवारी मिळवलेले अनिल गोटे तिथे चर्चेत आले आहेत. भाजपच्या अनुप अग्रवालांचीही हवा आहे. त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होऊन पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर मोदींच्याच प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह लागेल. अजित पवारांची बाजी शक्य अजित पवारांनी इथे फारशी ताकद लावली नसली तरी त्यांचे उत्तर महाराष्ट्रात ६-७ उमेदवार निवडून यायला हरकत नाही, असे दिसते. कदाचित शरद पवारांच्या कमी जागा निवडून आल्या तरी आश्चर्य वाटू नये, ही वस्तुस्थिती आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)