Published on
:
18 Nov 2024, 3:25 am
Updated on
:
18 Nov 2024, 3:25 am
मुंबई : राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफांची धडधड सोमवारी संध्याकाळी सहा वाजता थांबणार आहे. त्यानंतरचे ४८ तास निवडणुकीतील निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहेत.
४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ५ तारखेपासून राज्यात प्रचाराने वेग पकडला. सर्वपक्षीय उमेदवारांना ५ ते १८ नोव्हेंबर असे दोन आठवडे प्रचारासाठी मिळाले. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांनी महाराष्ट्र ढवळून काढला.
प्रचाराचे नियोजन करताना महायुती आणि 'मविआ' या दोन्ही आघाड्यांनी आपले प्रमुख नेते सर्व प्रमुख विभागांत जाऊन तेथील सभांना संबोधित करतील, याची काळजी घेतली. महायुतीच्या प्रचारात मुख्य आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर महाविकास आघाडीत राहुल गांधी हे मुख्य आकर्षण राहिले. प्रचार संपण्यापूर्वी शेवटच्या रविवारी राज्यभर प्रचारसभा आणि रोड शो यांचा धुरळा उडविण्यात आला. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता प्रचार संपल्यावर बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान सुरू होईपर्यंतचा कालावधी सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात विविध माध्यमांतून मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
प्रभाव पाडणाऱ्या बाबींना मनाई
राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी मतदान संपण्यापूर्वी ४८ तास म्हणजेच सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून सुरू होत आहे. दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या आणि निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे. राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.