सावंतवाडी ः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 39 हजार 899 चे मताधिक्य घेत विजयाचा चौकार ठोकला. त्यांनी महाविकास आघाडीचे तथा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली (41, 109 मते) यांचा पराभव केला. यावेळी मतदारसंघात चौरंगी लढत असूनही दीपक केसरकर यांनी मागील वेळेपेक्षा अधिक मते मिळवली. विजयी दीपक केसरकर यांना 81 हजार 008 तर प्रमुख पराभूत उमेदवार महाविकास आघाडीचे राजन तेली यांना 41,109 मते, भाजपचे बंडखोर विशाल परब यांना 33 हजार 281 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)च्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे-परब यांना केवळ 6174 मते मिळाली. अपक्ष उमेदवार दत्ताराम गावकर यांना 1234 आणि सुनील पेडणेकर यांना 899 मते मिळाली. नोटाला 2385 मते मिळाली.
गेले तीन टर्म सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणार महायुतीचे उमेदवार आणि मंत्री दीपक केसरकर यांनी चौथ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी होत नवा विक्रम केला, तर मविआचे उमेदवार राजन तेली यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक झाली. सन 2019 च्या निवडणुकीत अपक्ष असलेले राजन तेली यांना 56 हजार मते मिळवली होती, मात्र यावेळी राजन तेली यांना 41 हजार मते मिळाली. अशाप्रकारे राजन तेली यांना तिसर्यांदा केसरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. लोकसभेला खा. राणेंना मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिकच मताधिक्य घेत केसरकर विजयी झाले.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून 53 हजार मते मिळाली होती, परंतु विधानसभेना या मतांमध्ये सुमारे 12 हजार मतांची घट झाल्याचे दिसून आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झाली. यामध्ये महायुतीचे दीपक केसरकर, महाविकास आघाडीच राजन तेली यांच्यासह महाविकास आघाडीच्या बंडखोर अर्चना घारे-परब आणि महायुतीचे बंडखो विशाल परब असे प्रमूख चार उमेदवार रिंगणात होते. विशाल परब यांनी सुरुवातीपासून प्रत्येक फेरीमध्ये सरासरी दोन हजार मते मिळविली, तर ‘सावंतवाडीची लेक’ अशी टॅगलाईन घेऊन प्रचार केलेल्या बंडखोर अर्चना घारे-परब महिलांची मते मिळवण्यात अयशस्वी ठरल्या. हे दोन्ही बंडखोर दीपक केसरकर यांची मते खाणार, असा कयास होता. मात्र या अपक्ष उमेदवारांचा परिणाम दीपक केसरकर यांच्या मताधिक्यावर झाला नाही उलट महाविकास आघाडीची मते कमी होऊन महायुतीच्या मतांमध्ये वाढ झाली.
प्रत्येक फेरीत दीपक केसरकरांचे वाढते मताधिक्य पाहून तिसर्या फेरीपासूनच केसरकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत जल्लोष करण्यास सुरुवात केली. दुपारी 12 वा. दीपक केसरकर मतमोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. विजयानंतर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रेमानंद देसाई यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी दीपक केसरकर यांना उचलून घेत जल्लोष केला. शिवसेना महिला जिल्हा संघटक अॅड. नीता सावंत. कविटकर, अनारोजिन लोबो, विद्याधर परब, सूरज परब, राजेेंद्र निंबाळकर, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बाळा गावडे, सचिन वालावलकर, गणेश प्रसाद गवस, बबन राणे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये दीपक केसरकर यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, मुलगी सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जुन वगळ आदींसह केसरकर कुटुंबिय सहभागी झाले होते. 23 व्या फेरीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी केसरकर यांचा विजय जाहीर केला.
विजयाचा चौकार अन् विरोधकाच्या पराभवाची हॅट्रीक
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी विजयाचा चौकार मारतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या पराभवाची हॅट्ट्रिकही केली. चौरंगी लढतीत विरोधकांनी घेरलेले असताना त्यांनी हे चक्रव्यूह भेदत मागील तीन टर्मपेक्षा अधिक मते घेत तिन्ही विरोधकांना धूळ चारली. पहिल्या फेरीपासून घेतलेले मताधिक्य कायम राखण्यात केसरकर यशस्वी झाले.
विजयाचे श्रेय नेते, कार्यकर्ते व मतदारांना
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे दीपक केसरकर यांनी आभार मानले. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सावंतवाडी मतदारसंघातील जनतेमुळे आपला विजय झाला. असे सांगत विजयाचे श्रेय दीपक केसरकर यांनी सावंतवाडीची जनता व महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिले.