Published on
:
28 Nov 2024, 11:41 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:41 pm
सद्य परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रिपदाचे जे काय होणार आहे, ते जवळपास ठरल्यात जमा आहे. याचा अर्थ पुढे जे काय व्हायचे ते सागर बंगल्यावरून होणार आहे. साहजिकच निवडून आलेले आमदार भराभर गाड्या काढून सागर बंगल्याभोवती गर्दी करत आहेत. कधी कोणत्या गोष्टीला महत्त्व येईल, ते सांगता येत नाही. ‘वर्षा’वर असलेली गर्दी आता ‘सागर’वर होत आहे. याचा अर्थ राज्याच्या पुढील राजकारणाचे केंद्र सागर बंगल्यावरच आहे, हे सिद्ध होत आहे.
जे काय असेल ते असेल; परंतु राजकारणाचे केंद्र नेहमी बदलत असते. कोणतेही एक केंद्र निश्चित नसणारी गोष्ट म्हणजे राजकारण होय. निवडणूक निकालाने राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले. काही लोक अजूनही एवढी मोठी त्सुनामीची लाट का आली, याचा विचार करत आहेत, तर काही लोक ईव्हीएमने कसा गोंधळ केला, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण हरू शकतो हे बर्याच लोकांना माहीत होते; परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात पालापाचोळा उडून जावा तशी परिस्थिती होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. साहजिकच हे लोक ईव्हीएम किंवा इतर गोष्टींवर दोष टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जे निवडून आले त्यांची परिस्थिती वेगळी आहे. त्यांना बाकी काही नको, त्यांना केवळ पुढचे मंत्रिपद पाहिजे आहे. ते सर्व मुंबईत तळ ठोकून आहेत. कोणत्या सत्ताधारी पक्षाला कोणते मंत्रिपद आणि किती मंत्रिपदे मिळतील, याचा निर्णय सागर बंगल्यावर होणार आहे. सागर बंगल्यावरून कृपा झाली, तर मंत्रिपदे जास्त मिळतील आणि त्यात आपला नंबर लागावा, याचा प्रयत्न प्रत्येक आमदार करतो आहे. अर्थात, यात चूक काहीच नाही; परंतु होणारी गर्दी आवरता आवरता सागर बंगला बेजार झालेला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने जातिपाती या पलीकडे जाऊन मतदान केले आहे, याचा मनस्वी आनंद प्रत्येक मराठी माणसाला झालेला आहे. समजूतदारपणे माघार घेतली, असे समजदारपण राजकारणामध्ये दाखवणे आजकाल दुर्मीळ झाले आहे. प्रत्येक जण स्वतःच्या अहंकारात नखशिकांत बुडालेला असूनही दाखवलेला समजूतदारपणा आवर्जून दखल घ्यावी असा आहे. वेळप्रसंग ओळखून माघार घेणे यातच खर्या योद्ध्याचे यश असते. निवडणुकांमुळे कुणी आनंदी असेल, कोणी नाराज असेल; परंतु महाराष्ट्र समृद्ध झाला आहे, हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. असा समजूतदारपणा महाराष्ट्र राज्यात वाढीला लागला पाहिजे व हे राज्य संपन्न व सुजलाम, सुफलाम तसेच सुसंस्कृत झाले पाहिजे यासाठी आमच्या शुभेच्छा. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय धुरळा उडल्याचे दिसून येत आहे. महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने आता राज्यात स्थिर सरकारने येणार हे जवळपास निश्चित झाले आहे; पण त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा रंगली असताना महायुतील नेत्यांनी समजूदारपणा दाखवून देवा भाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. लाडक्या बहिणींनी महायुतील मोठे पाठबळ दिल्याने महायुतीचे सरकार आले.