प्रातिनिधिक छायाचित्रfile photo
Published on
:
05 Feb 2025, 5:49 am
Updated on
:
05 Feb 2025, 5:49 am
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. मात्र, यावर्षी एकाच वेळी एवढे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथकाकडून गेल्या दोन वर्षांमधील जीबीएस रुग्णांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी जीबीएस रुग्णांची माहिती संकलित करून आजाराच्या ‘पॅटर्न’चे विश्लेषण केले जाणार आहे.
जीबीएसच्या अभ्यासासाठी रुग्णाचा पत्ता, लक्षणे, उपचार, प्रवासाची पार्श्वभूमी, उपचारपद्धती अशी माहिती उपसंचालक कार्यालयास देण्याच्या सूचना जलद प्रतिसाद पथकाकडून करण्यात आल्या आहेत. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची माहिती घेण्यासाठी व वैद्यकीय मदतीसाठी नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. पुणे परिमंडळात आढळून आलेल्या 163 रुग्णांपैकी 77 रुग्ण हे नांदेडगाव येथील 5 किमी परिसरातील आहेत. उर्वरित रुग्ण पुण्यातील इतर भागांतील व इतर जिल्ह्यांतील आहेत.
नांदेडगाव येथील उद्रेक लक्षात घेऊन तेवढ्याच भागाचे अहवाल घेऊन त्या भागातील रुग्णांचे नमुने घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली असता, 26 ठिकाणी पाण्यात क्लोरिनचे प्रमाण शून्य आढळून आले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने त्या घरापर्यंत कमीत कमी 0.2 पीपीएम क्लोरिनचे प्रमाण राहील, ही खातरजमा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश जलद प्रतिसाद पथकाकडून देण्यात आले आहेत.
राज्य किंवा जिल्हा प्रयोगशाळेकडे पुरेशी यंत्रणा असल्याने जैववैद्यकीय तपासणीचे पाणी नमुने हे एनआयव्हीकडे न पाठवता राज्य किंवा जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात यावेत.
सर्व रुग्णांचे रक्त व शौच्छ नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत.
आजारास कारणीभूत असणार्या जिवाणू/विषाणूमध्ये जनुकीय बदलांबाबत अभ्यास होणे आवश्यक आहे.
इंजेक्शन आयव्हीआयजीच्या सध्या 1500 व्हायल्स उपलब्ध आहेत. या उपलब्ध साठ्याबाबत माहिती घेण्यात यावी. विशेषतः विक्रेत्यांमार्फत जादा दराने विक्री होऊ नये, यासाठी तपासणी करावी व त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
काशिबाई नवले हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या ठिकाणी प्लाझमा फेरेसिस ट्रीटमेंट चालू ठेवण्यात यावी. यासाठी विशेषज्ञांची गरज आवश्यक असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.
उद्रेक भागामधील फूड सॅम्पल घेण्यात येऊन तपासणीकरिता एनआयव्हीकडे पाठविण्यात यावेत.
उद्रेक झालेल्या कार्यक्षेत्रातील पोल्ट्री फॉर्ममधील सॅम्पल्स एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवावेत.
ज्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, अशा रुग्णांची मानसिक स्थिती ठीक राहण्यासाठी डिस्चार्ज रुग्णांची यादी व संपर्क क्रमांक प्राप्त करून घेऊन टेलिमानसद्वारे रुग्णांचे वरिष्ठ मनोविकृतीतज्ज्ञ यांच्यामार्फत समुपदेशन करण्यात यावे.