Published on
:
08 Feb 2025, 3:53 am
Updated on
:
08 Feb 2025, 3:53 am
नाशिक : आडगाव येथून शहर पोलिसांनी आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहेत. हे नागरिक अवैधरित्या भारतात आल्याचे उघड झाले आहेत. त्यापैकी तिघांकडे आधारकार्ड व रहिवासी दाखला आढळून आला आहे. हे दाखले संशयितांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून काढल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीेने तपास सुरु केला आहे.
शहरात काही बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्तीचे प्रभारी डॉ. अंचल मुद्गल यांच्या पथकाने वेशांतर करून आडगाव येथील एका निर्माणाधीन इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांची ४ दिवस रेकी केली. त्यानंतर तेथून चौकशीनंतर आठ बांगलादेशी मजूरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइलमध्ये बांगलादेशची शासकीय कागदपत्रे आढळून आले. तसेच तिघांकडे रहिवासी दाखला व आधारकार्डही आढळून आले. पाेलिसांच्या सखोल तपासात आलीम सुआनखान मंडल (३२), अलअमीन आमीनुर शेख (२२) व मोसीन मोफीजुल मल्ला (२२) या तिघांकडे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कोळीमळा, भुजबळ चाळ येथील रहिवासी दाखल मिळून आला. तसेच या पत्त्याच्या आधारेच संशयितांनी आधारकार्ड काढल्याचे उघड झाले. संशयितांनी ग्रामपंचायतीतील एका महिलेस हाताशी धरून आधारकार्ड काढल्याचे समोर आले आहे.
मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशापेक्षा भारतात मजुरांना जास्त पैसे मिळतात. त्यामुळे हे आठही जण भारतात चोरमार्गे आले. त्यांच्याकडे पासपोर्ट नसून ज्या एजंटमार्फत ते भारतात शिरले त्यांची माहितीही या ८ जणांकडे नसल्याचे समजते. येथून पैसे कमवून कोलकाताला पैसे पाठवून तेथून पुन्हा आाॅनलाइन पद्धतीने बांगलादेशातील नातलगांकडे पैसे पाठवण्यात येत होते.
बांगलादेशातील खुलना राज्यातील रहिवासी
पोलिसांनी पकडलेले आठही नागरिक हे बांगलादेशातील खुलना राज्यातील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. आठपैकी सुमन कालाम गाझी (२७) हा पुणे व नाशिकमध्ये १२ वर्षांपासून राहत असल्याने त्याच्या सांगण्यावरून व ओळखीच्या जोरावर इतर सात नागरिक भारतात अवैधरित्या शिरले व नाशिकला कामासाठी आले.