शिरीष महाराज मोरे Pudhari
Published on
:
05 Feb 2025, 7:48 am
Updated on
:
05 Feb 2025, 7:48 am
संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरीष महाराज यांनी यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता.
शिरीष महाराज यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसले तरी यामागे आर्थिक विवंचना हे कारण असल्याचे बोलले जात आहे. येत्या 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होता. त्यापूर्वीच महाराजांनी हे पाऊल उचलण्याने देहूवासीयांना मोठा धक्का बसला आहे.
शिरीष महाराज यांनी अलीकडेच नवीन घर बांधले होते. त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील राहत होते, तर ते स्वतः वरच्या मजल्यावर राहत होते. मंगळवारी रात्री ते आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. मात्र, आज सकाळी ८:३० वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. घरच्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जबरदस्तीने दार तोडून पाहिले असता, त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी या पत्राचा तपशील गोळा केला असून, प्राथमिक तपास सुरू आहे. त्यांच्या मोबाईलचा डेटा संपूर्णपणे फॉरमॅट करण्यात आला असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक तपासात ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करत आहेत.
त्यांच्या पश्चात आई आणि वडील आहेत. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत. ते प्रसिद्ध हिंदू धर्मप्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते. ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते.
हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असतं. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले.
प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेल्या शिरीष महाराज यांच्या आत्महत्येमुळे परिसरात आणि वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे.
अंत्यसंस्कार दुपारी चार वाजता
शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे देहू आणि वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे.