धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.(file photo)
Published on
:
30 Jan 2025, 8:06 am
Updated on
:
30 Jan 2025, 8:06 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत चालला आहे. 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जर मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा,' असे मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजितदादा जी काही भूमिका घेतील तीच अधिकृत असेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
''मंत्री धनंजय मुंडे यांची आज सकाळी दिल्लीत भेट झाली. धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. यामुळे त्यांना भेटण्याची मला चोरी नाही. मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत जी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे तीच आमची भूमिका आहे.'' असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गुरुवारी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवी दिल्ली कार्यालयाचे उदघाटन झाले. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील हेमंत कक्षात हे नवे कार्यालय आहे. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील घडामोडीवर भाष्य केले.
धनंजय मुंडे यांनी बुधवारी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी ''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जर मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा, मी राजीनामा देणार. मी दोषी आहे का? हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील.'' असे म्हटले होते.