Published on
:
28 Nov 2024, 7:28 am
Updated on
:
28 Nov 2024, 7:28 am
म्हासुर्ली : दिगंबर सुतार
स्वातंत्र्यपूर्व काळापासून धामणी नदीवर पाणी साठवण्यासाठी मातीबंधारे बांधण्याची परंपरा सुरू आहे. नोहेंबर-डिसेंबर दरम्यान बंधारे बांधण्याची स्पर्धाच असते. त्यामुळे निरव शांततेत असणाऱ्या नदीकाठावर यंत्रांच्या आवाजाची घरघर सुरू असते. यंदाही नदीवर माती बंधारे बांधण्याची लगबग सुरू आहे. त्यातच घळभरणीच्या कामालाही गती आली आहे. यंदा धामणी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नदीमध्ये बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यांवरील यंत्रांची घरघर कायमचीच थांबणार आहे.
धामणीतून पाणी कधी सुटणार?
धामणी नदीवरील धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळभरणीचे काम चालू असून येत्या पावसाळ्यात एक ते सव्वा टी.एम.सी पाणी अडवण्याचा शासनाचा माणस आहे. प्रकल्प पूर्णत्वाअभावी दरवर्षी उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडून भीषण पाणीटंचाईने या परिसराची आजवर प्रगती रोखून धरली. नुसती वर्षेच नाही तर काही दशके येथील लोकांनी ज्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहिली तो धामणीतून पाणी सुटण्याचा दिवस नक्कीच जवळ आल्याने लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुरेशा पाण्याअभावी पारंपारिक शेती व्यवसायात बदल होवून हरितक्रांतीची जोड मिळणार आहे. याशिवाय पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधणे तर पाणी संपले की नदीत खड्डे खोदणे यासाठी होणाऱ्या अनाठायी खर्चातून लोकांना मुक्ती मिळणार आहे.
उन्हाळ्यात मातीबंधारे ठरतात आधारवड
नदीवर मातीबंधारे बांधून शेती जगवणारा धामणी खोरे हा जिल्हयातील एकमेव भाग आहे. नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत, मग खर्चीक मातीबंधारे बांधण्याचा शेतकऱ्यांकडून उपद्व्याप का केला जातो? असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र पावसाळयानंतर झपाट्याने घटणारा नदीचा पाणीप्रवाह वेळीच अडवावा लागतो. कोल्हापूर पद्घतीच्या बंधाऱ्यांत पाणीसाठा केल्यास गळतीमुळे जास्त काळ पाणी राहत नाही. कोरड्या पडणाऱ्या बंधाऱ्यांत पाण्याचे पूणर्भरण होण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही नसल्याने पाण्याअभावी लोकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. प्रवाहीत पाण्याचा योग्य संचय व्हावा, तसूभरही पाण्याचा निचरा होवू नये यासाठी मातीबंधारे बांधले जातात. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात हे बंधारे कोरडे पडत असले तरी हे मातीबंधारेच लोकांना आधारवड ठरतात.
पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी वर्षानुवर्षे मातीबंधाऱ्यांच्या चकव्युहात येथील शेतकरी अडकला. श्रमाबरोबर पैशाच्या अपव्ययाने शेतीतच शेतकरी खपत गेला. लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तर स्वतः बाळगलेला संयम यातून तो चक्रव्यूह भेदून बाहेर पडणार आहे. महिनाभरापूर्वीच घळभरणी कामाचा शुभारंभ झाला. कामही गती घेत आहे. प्रकल्पकामी शर्थीचे प्रयत्न केलेले ते आ. प्रकाश आबिटकर यांच्या विजयाने यंदाच पाणी अडण्याचा लोकांचा विश्वास आहे. नदी प्रवाहित झाल्यास बंधारे बांधण्याची कटकट इथून पुढे कायमचीच थांबणार आहे.