नागराज मंजुळे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव:एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
2 hours ago
1
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रीतेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव यांनी दिली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे यांची निवड करण्यात आली आहे. अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपट सृष्टीतील कार्यातून महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला आहे. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२४ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)