रत्नागिरी : नाचणे गुरुमळी येथील रस्त्यावरील मोरीचे अर्धवट असलेले काम.pudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 1:05 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:05 am
रत्नागिरी :शहरानजीकच्या नाचणे-गुरुमळीवाडीकडे जाणार्या रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी मागील महिनाभर रस्ता खणण्यात आला असून, मोरी बांधण्याचे काम बंद असल्याने रात्रीच्यावेळी पादचारी ग्रामस्थ व दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यातच एसटी बस बंद झाल्यामुळे शाळकरी मुलांचेही हाल होत असून, हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी गुरुमळीवासीयांनी केली आहे.
नाचणे गोडावून स्टॉप येथून गुरुमळीत जाणार्या रस्त्यावर बाणेवाडीच्या पुढे असणार्या छोट्या नाल्यावर मोरी बांधण्याचे हाती घेण्यात आले आहे. नाल्यामध्ये गाळ भरल्यामुळे पहिली मोरीही गाळाने भरल्याने, मोठया पावसात रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे मोरीची उंची वाढवून नव्याने काम होणार आहे. मागील महिनाभरापासून पहिली मोरी खणून काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आंबाबागेमधून तात्पुरता छोटा रस्ता उभारण्यात आला असून, त्यातून दुचाकी व तीनचाकी वाहनेच जात आहेत. जुनी मोरी खणल्यामुळे गुरुमळीत जाणारी एसटी सेवा बंद झाली आहे. गॅस वाहतूकही बंद असल्याने सिलेंडरसाठी ग्रामस्थांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.
हा रस्ता खणून महिना होत आला आहे, त्यातील तीन ते चारच दिवस काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संथगतीने काम झाल्यास पावसाळा उजडेल अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. शाळांच्या परीक्षा सुरु होतील. शिमगोत्सव लवकरच सुरु होणार आहे. या रस्त्याचा वापर गुरुमळीतील सर्व ग्रामस्थ करीत असतात. विकासकामांना ग्रामस्थांचे सहकार्य आहेच; परंतु ठेकेदाराने लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.