Published on
:
23 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:46 pm
मुंबई : यावेळी विधानसभेला राज्यभरात महिला मतदारांच्या प्रमाणात लक्षवेधी वाढ झाल्याचे दिसून आले. एकूण 65.21 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्याचा फायदा अर्थातच महायुतीला झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण 5.95 टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे, पुरुष मतदारांचा टक्काही 4.07 टक्क्यांनी वाढला आहे. महिलांची मते निर्णायक ठरली आहे.
राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांपैकी एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष मतदारांची संख्या 3 कोटी 34 लाख 37 हजार 57, तर महिला मतदारांची संख्या 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 होती. त्याशिवाय यंदा 1 हजार 810 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले. 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाचा टक्का हा 5.95 टक्क्यांनी वाढला आहे. 65.21 टक्के महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. मागील निवडणुकीत हेच प्रमाण 59.26 टक्के इतके होते. या तुलनेत यंदा जवळपास 66.84 टक्के पुरुष मतदारांनी मतदान केले. 2019 च्या निवडणुकीत हेच प्रमाण 62.77 टक्के इतके होते.
लाडकी बहीण योजनेचा हातभार
महिला मतदारांचे प्रमाण वाढण्यामागे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा हातभार लागल्याचे दिसते. या योजनेंतर्गत राज्य सरकारने पात्र महिलांना महिना दीड हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला. राज्यातील सुमारे 2 कोटी 31 लाख 56 हजार 860 हून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला.