मतदान यंत्रांची पडताळणी करून झालेल्या मतदानाच्या व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्याची मागणी नाशिक पश्चिमचे शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे. याबाबत निवडणूक शाखेने पलटी मारली असून, नव्या यंत्रात मतदानाची चाचणी अर्थात मॉक ड्रिल करण्याचा उपाय सांगून ईव्हीएम घोटाळा दडपण्याचा आटापिटा सुरू केला आहे.
बडगुजर यांनी या मतदारसंघातील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याची, व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठय़ांची फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. झालेल्या मतदानाच्या पाच टक्के व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करता येईल, यासाठी प्रतियंत्र चाळीस हजार रुपये अधिक जीएसटी असे निर्धारित शुल्क भरा, असे पत्र जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले होते. त्याची पूर्तता करण्याची तयारी बडगुजर यांनी दर्शविली होती. मात्र, असे केले तर ईव्हीएम यंत्रातील घोटाळा चव्हाटय़ावर येईल, अशी भीती प्रशासनात निर्माण झाली.
एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरमोजणी करता येत नाही. मतदानाच्या दिवशी ज्या यंत्रांमध्ये मतदान झाले, त्यातील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठय़ा मोजता येणार नाहीत, असे बडगुजर यांना निवडणूक शाखेतून सांगण्यात आले. नवीन यंत्रांमध्ये चाचणी मतदान प्रक्रिया अर्थात मॉक ड्रिल घेऊन खात्री करता येईल, असे सांगितले. ईव्हीएमचा घोटाळा दडपण्यासाठी प्रशासनाने मॉक ड्रिलचा उतारा शोधला असल्याची चर्चा आहे. मॉक ड्रिलला बडगुजर यांनी स्पष्ट नकार दिला आहे.