Published on
:
18 Nov 2024, 1:05 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:05 am
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार नीतेश राणे यांनी मला जाहीर सभेसाठी निमंत्रित केले होते; मात्र हवामान खात्याने अनुकूलता न दर्शवल्यामुळे ऐनवेळी मला सभा रद्द करावी लागली. तसेही जेथे जेथे नीतेश राणे हे नाव येते, तिथे तिथे हवामान बदलण्याची ताकद या नेत्यांमध्ये आहे. कडवा हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. मी त्यांना म्हटले की, तुम्ही निवडून तर येणारच आहात तरीपण त्यांनी प्रेमापोटी मला सभेला येण्याचा आग्रह केल्याने मी नाही म्हणू शकलो नव्हतो, तरी माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्या पाठीशी आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओद्वारे काढले आहेत.
फडणवीस यांनी या व्हिडीओत म्हटले आहे, नीतेश राणे हे नव्या रक्ताचे हिंदुत्ववादी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. विधानसभेतील त्यांची भाषणे अभ्यासपूर्वक आहेत. संपूर्ण राज्यात हिंदू जागरणाचे त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांना विजयासाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. स्वतः खा.नारायण राणे तिथे असल्याने माझ्या प्रचाराची कणकवली मतदारसंघात तशी गरज पण नाही.(Maharashtra assembly poll)
नीतेश राणे यांनी आमदार म्हणून केलेले कामच त्यांना निवडून आणण्याकरिता पुरेसे आहे. कणकवली मतदारसंघातील सर्व मतदारांना माझे विनम्र आवाहन आहे की, संघटित शक्तीसाठी नीतेश राणे विधानसभेत असलेच पाहिजे. त्यांना आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीतेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.