निरोगी कुटुंब, निरोगी देश हा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा:मधुमेहतज्ञ डॉ. सुरेखा लोखंडे यांचे आवाहन

6 days ago 2
सकारात्मक व तणाव मुक्त जीवनशैली, संतुलित आहार, व्यायाम अशा उपायांनी मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. धकाधकीची जीवनशैली, बदलती आहार पद्धती, विश्रांती व व्यायामाचा अभावाने आगामी काळात मधुमेह रुग्णांची संख्या जगात व देशात वेगाने वाढणार आहे. याविषयी जाणीव जागृती व्हावी म्हणून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. घरामध्ये पालकांनी पुढच्या पिढीला आरोग्यपूर्ण जीवनाचा मूलमंत्र सक्तीने अमलात आणण्याचे शिक्षण द्यावे. निरोगी कुटुंब, निरोगी देश असा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा, असे आवाहन मधुमेह तज्ञ डॉ. सुरेखा लोखंडे यांनी केले. जागतिक मधुमेह दिनानिमित्त गजानन हॉस्पिटल व तालुका निमा संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत शहरातील सुमारे दोनशे रुग्णांची विविध प्रकारची मोफत तपासणी करण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील शेवगाव रस्ता, नाईक चौक, अजंठा चौक, क्रांती चौक, नवी पेठ मार्गे शहरातील सर्व डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य आदींनी जागृती रॅली काढली. यामध्ये बर्ड संस्थेचे डॉ. दीपक देशमुख, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, डॉ. सचिन लोखंडे, वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुपचे गणेश पंडित, उद्योजक राजेंद्र एडके आदी या रॅलीत सहभागी झाले. डॉ. लोखंडे म्हणाल्या, मधुमेह, रक्तदाब, अनिद्रा, स्थूलपणा असे आजार माणसाने स्वतःच्या चुकीच्या जीवनशैलीने ओढवून घेतले आहेत. मोबाईलचा अतिरेकी वापर, टीव्ही पुढे बसून आहार घेणे, चालण्याचा अभाव, अत्यंत बेमालूमपणे शरीरात विविध आजारांची निर्मिती करत आहेत. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य आदींच्या सेवनाचे प्रमाण घटून जंक फूड, हॉटेलमधील खाणे, शीतपेये यांचा अतिरेक होत असून मुलांना सुद्धा आपण रोगांच्या हवाली करीत आहोत. दैनंदिन जीवनशैलीचे वेळापत्रकात व्यायाम करणे, गप्पागोष्टी, हास्यविनोद, अशा गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. सोशल मीडिया, मोबाईल व तत्समसाधनांमध्ये माणूस हरवत चालला आहे. शरीराकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. शरीराची दैनंदिन देखभाल, तपासणी आवश्यक असून जगात सर्व काही विकत मिळत असले तरी शरीर व त्याचे आरोग्य विकत मिळत नाही. त्यासाठी खबरदारी, आरोग्य शिक्षणाची गरज आहे. किमान तीन महिन्यातून एकदा मधुमेही रुग्णांनी, वर्षातून एकदा सर्वसामान्य नागरिकांनी आरोग्य तपासणी आवश्य करून घ्यावी. रक्तदाब, मधुमेह अशा आजारांना गांभीर्याने घेऊनच उपाययोजना करावी, असे लोखंडे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article