नेवासे फाट्यावरील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण सुटले:अकराव्या दिवशी स्थानिक नेत्यांची मध्यस्थी झाली यशस्वी

2 hours ago 1
धनगर समाजास अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या १८ सप्टेंबरपासून सुरू असलेले नेवासे फाट्यावरील उपोषण शनवारी दुपारी सुटले. भाजप नेते नितीन दिनकर व भाजप उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या आश्वासनाने उपोषण सोडवण्यात आले. उपोषणकर्त्यांचे मार्गदर्शक अशोक कोळेकर यांनी हे उपोषण सुटल्याचे जाहीर केले. दोघा उपोषणकर्त्यांनी जलसमाधी घेत असल्याचे सांगितले. मात्र ते जिवंत सापडल्याने हे उपोषण चर्चेचा विषय ठरले होते. भाजपचे राज्य प्रवक्ते नितीन दिनकर व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी शनिवारी दुपारी पावणेपाच वाजता उपोषणकर्त्यांना नारळ पाणी दिल्यानंतर हे उपोषण सुटल्याचे जाहीर करण्यात आले. दिनकर यांनी उपोषणकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कळवणार असून उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घालून देणार असल्याचे सांगितले. अशोक कोळेकर, दिनकर व लंघे, अण्णासाहेब बाचकर, नवनाथ पडळकर यांच्या विनंतीला मान देत उपोषण सोडण्यात आले. आमदार शंकरराव गडाख समर्थक राजू काळे, धनंजय काळे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यावेळी उपस्थित होते. अशोक कोळेकर यांनी उपोषणकर्ते व आंदोलनात सहभागी असलेल्या सहकार्य केलेल्यांचे यांचे आभार मानले. उपोषण सुटल्याचे जाहीर करताच येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देण्यात आल्या. अजय कोळेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, तालुकध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनीही उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. सामाजिक कार्यकर्ते गणेश चौगुले अकराही दिवस उपोषणकर्त्यांना सेवा देण्यासाठी ठाण मांडून राहिले. अकरा दिवसांपासून नेवासे फाट्यावर धनगर समाजाचे स्थानिक नेते अशोक कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरचे प्रल्हाद सोरमारे, नगरचे बाळासाहेब कोळसे व राजू तागड, जालन्याचे रामराव कोल्हे, अंबडचे भगवान भोजने व जामखेड येथील देवीलाल मंडलिक उपोषणास बसले होते. गेल्या गुरुवारचे जलसमाधी नाट्य, त्यानंतर सरकारी यंत्रणेची धावपळ, दिवसभरात पाच वेळा नगर-संभाजीनगर मार्गावर झालेले रास्ता यामुळे हे उपोषण चांगलेच गाजले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article