Published on
:
31 Jan 2025, 1:54 pm
Updated on
:
31 Jan 2025, 1:54 pm
धाराशिव : काही वर्षांपूर्वी अशाच संकटात भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे सापडल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गडाचा आधार मागितला होता. तेव्हा राजकीय कारणासाठी असा गडाचा वापर करता येणार नाही म्हणत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी पंकजा यांच्यासाठी गडाचे दरवाजे बंद केले होते. तो न्याय आता का नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला.
खासगी कामानिमित्त ते शुक्रवारी धाराशिव येथे आले होते. त्या वेळी त्यांनी काही वृत्तवाहिन्यांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की मिडीया ट्रायलच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. धनंजय मुंडे सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून असे चुकीचे काम होणार नाही. केवळ विरोधक टीका करत आहेत म्हणून राजीनामा घेणेही चूक आहे. पुरावे असतील तर तपास संस्थांकडे दिले पाहिजेत.
श्री. महाजन म्हणाले, की नामदेव शास्त्री हे न्यायाचार्य आहेत. त्यांनी स्त्री - पुरुष असा भेद करायला नको होता. ज्या न्यायाने त्यांनी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले ते आता धनंजय यांच्यासाठी उघडणे योग्य कसे ठरते? त्या वेळी भगवान गडाचे दरवाजे पंकजांसाठी बंद केले असले तरी समाजाने तळहाताच्या फोडाप्रमाणे पंकजांना जपले. पंकजा व धनंजय दोन्हीही चांगले नेते आहेत. त्यांना अडचणीत आणले जात आहे. पण मिडीया ट्रायल का घेतली जात आहे, याचा विचार धनंजय यांनी केला पाहिजे, असेही महाजन यावेळी म्हणाले.