"पतीवर्ता' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रंगला:मराठी साहित्यात वऱ्हाडीने मोलाची भर घातली- प्रा. ज्ञानेश वाकुडकर
1 day ago
1
मराठी साहित्यात वऱ्हाडीने मोलाची भर घातली असून विदर्भात शंकर बढे, विठ्ठल वाघ यांच्यानंतर बापूराव झटाले यांच्या कवितेत प्रतिभा आणि प्रबोधन यांचा सुरेख संगम जाणवतो, असे प्रतिपादन प्रख्यात कवी आणि लोकजागर चळवळीचे प्रमुख प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी सोमवारी येथे केले. बापूराव झटाले यांच्या ८० व्या जन्मदिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या "पतीवर्ता' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून प्रा. वाकुडकर शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकांत तिडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गजानन नारे, कवी आ. की. सोनोने, शिवलिंग काटेकर, हिंमत ढाळे, पुरुषोत्तम आवारे, नरेंद्र इंगळे उपस्थित होते. कवी आणि चिंतक बापूराव झटाले यांच्या कविता वाचून त्यातील आशय आणि प्रबोधनाची उंची मोठी असून वऱ्हाडी कवी शंकर बढे यांच्या उंचीचा दर्जा या कवितांना असून त्यांनी सत्तरच्या दशकात लिहिलेल्या कवितांमधून शेतकऱ्यांचे जे जीवन उभे केले आहे, ती आजही ताजी वाटते. हिच कवीच्या दूरदृष्टीची कमाल असते असेही प्रा. वाकुडकर म्हणाले. वाकुडकरांनी यावेळी बापूराव झटाले यांच्या काही कवितांचे अत्यंत सुंदर शब्दात रसग्रहण केले आणि स्वतःच्या काही गाजलेल्या रचना सुद्धा सादर केल्या. तरुण लेखक आणि आयोजक चंद्रकांत झटाले यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडत या सोहळ्याचा खटाटोप आपण वडिलांच्या अपरोक्ष केला आहे. कारण त्यांना प्रसिद्धी आणि सोहळ्यातून मिळविणे आवडत नाही, इथे त्यांना आणल्यावरच असा काही सोहळा असल्याचे त्यांना कळले असल्याचे प्रा. वाकुडकर म्हणाले. यावेळी मान्यवरांची बापूराव झटाले यांच्या काव्य प्रतिभा आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी बापूराव झटाले यांची कन्या विद्या साबळे, सून भाग्यश्री झटाले, मित्र लखुजी सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. संजय कावरे यांनी करून आभार चंद्रकांत झटाले यांनी मानले. कार्यक्रमस्थळी वऱ्हाडी शब्दांनी सजवलेला सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सौरभ वाघोडे, मयूर गोठकडे, अक्षय झटाले, मीना म्हैसने, शुभम कांबळे, सृष्टी राऊत, गायत्री तराळे, निकिता ठाकरे, कोमल ठोकळ आदींनी परिश्रम घेतले. यांनी केला सन्मान : बापूराव झटाले यांचा यावेळी मराठा महासंघाचे विनायक पवार,शिक्षसन संस्था चालक संघातर्फे विजय कौसल, एम. आर. इंगळे, अॅड. क्षीरसागर, आदर्श विद्यालयाचे सुधाकर पोलकट, अकोल्याची जत्रा तर्फे शरद वानखडे, राजश्री देशमुख, नरेंद्र चिमणकर, किशोर बळी, श्याम देशमुख, अॅड. अनिल लव्हाळे, नाट्य परिषदतर्फे मधू जाधव, जनयात्रातर्फे मुख्य संपादक अविनाश देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी काव्यसंग्रहाचे सुबक मुखपृष्ठ रेखाटणारे कलावंत गजानन घोंगडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जगण्यातील विसंगती टिपली : डॉ. तिडके बापूराव झटाले यांची कविता वऱ्हाडी असो किंवा प्रमाण भाषेत असो तिला काळाचे उत्तम भान असताना ग्रामीण जीवनातील वास्तवावर बोट ठेवताना त्या जगण्यातील विसंगती टिपत पुढचे उपाय सुद्धा ही कविता सुचवत जाते. बापूराव झटाले यांच्या कवितेत मोठा आशय आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेवर दोन तासाचा स्वतंत्र कार्यक्रम होऊ शकतो. व्यासंग आणि सतत अभ्यास यातून माणसाचे चिंतन पुढे येते झटालेच्या काव्यात हेच चिंतन प्रकट झाल्याचे प्रा. तिडके यांनी म्हटले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)