Published on
:
01 Feb 2025, 1:54 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:54 am
पणजी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावी आणि दहावीसाठी लागू होत आहे. त्यासाठी पुस्तकेही बदलली जाणार आहेत. नवीन पुस्तके मार्च महिन्यात उपलब्ध होतील तसेच परीक्षा पद्धतीसुद्धा बदलली जाणार असून त्यासाठी ‘परख अॅप’चा आधार घेण्याची सूचना सर्व शाळांना देण्यात आली असून बहुतांश मुख्याध्यापकांनी नव्या शिक्षण व्यवस्थेचे स्वागत केले आहे. पर्वरी येथील एस. सी. आर. टी. सभागृहात राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक दोन सत्रांत झाली.
नवा अभ्यासक्रम हा राष़्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचाच (एन.सी. ई. आर. टी.) असेल. मात्र, त्यासाठीची पुस्तके तयार करण्याची जबाबदारी राष़्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे (एस. सी. ई. आर. टी.) कडे देण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी गोवा शान्लात मंडळाकडे होती. ही पुस्तके मार्च अखेरीस उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. यावेळी शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे, सचिव प्रसाद लोलयेकर, मार्गदर्शक रुपेश सावंत आदी उपस्थित होते. स्थानिक भाषांना प्राधान्य दिले जाणार असल्याने मराठी किंवा कोकणी ही भाषा पहिल्या स्तराची भाषा असेल. हा मान यापूर्वी इंग्रजी भाषेला होता. येत्या शैक्षणिक वर्षापासून भाषा माध्यम बदलून मराठी किंवा कोकणी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही भाषांपैकी एक भाषा सक्तीची असेल, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दुसर्या पातळीवर इंग्रजी भाषा, तर तिसर्या पातळीवर हिंदी किंवा संस्कृत अथवा पोर्तुगीज, फ्रेन्च अशा भाषांपैकी एक भाषा निवडण्याची संधी असेल. ही व्यवस्था पाहिल्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून तीन भाषा घेण्याची सोय करण्यात आली आहे. ज्यांना विज्ञान क्षेत्रात जायचेच नाही, त्यांच्यासाठी गणित व विज्ञान विषय 9 वी नंतर वगळता येणे शक्य होणार आहे. त्या ऐवजी चित्रकला, अर्थशास्त्र आदी विषयही निवडता येणार आहेत. यंदाच्या वर्षी तिसरी आणि नववी पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून 6 वी आणि 10 वी ला लागू होणार आहे. यंदा जसे बोर्डचे पेपर सर्वांना सारखे होते, तसेच इयत्ता सहावी, नववी व दहावीसाठी सर्व शाळांना एक सारखीच प्रश्न पत्रिका असेल.
एमसीक्यू पद्धतीने होणार परीक्षा
परीक्षा पद्धतीतही बदल केला जाणार असून त्यात ‘परख अॅप’वर ज्या पद्धतीने परीक्षा घेतली जाते, त्या पद्धतीने परीक्षा असेल. या अॅपवर दर शनिवारी परीक्षा घेतली जाते. एम. सी. क्यू. पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. ज्यात उत्तरांचे चार पर्याय दिले जातील. यापैकी एक निवडायचा आहे. चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह गुण द्यावेत की नाही, हे नंतर ठरवले जाणार आहे.