>> दुष्यंत पाटील
अठराव्या शतकाच्या शेवटच्या काळात बिथोव्हन एक उत्कृष्ट पियानोवादक आणि संगीतकार होऊन गेला. व्हिएन्नामधील ज्युलिएटा या उच्च घराण्यातली, देखण्या आणि बुद्धिमान तरुणीला बिथोव्हन पियानो शिकवताना तिच्या प्रेमात पडला. ज्युलिएटाविषयीची भावना बिथोव्हनने ‘मूनलाईट सोनाटा’ या रचनेतून केली, जी आजही लोकप्रिय आहे.
अठराव्या शतकाच्या शेवटी वयाच्या विशीमध्ये असणारा बिथोव्हन एक उत्कृष्ट पियानोवादक आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध झाला. विशीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याला कानामध्ये सतत काहीतरी आवाज आपोआपच ऐकू यायला लागला. शिवाय संगीतातल्या वरच्या सप्तकांमधले सूर ऐकू यायचे बंद झाले. तिशीत गेल्यावर हा आजार अजूनच बळावला. लोकांसोबत चालू असणारी संभाषणं, संगीताचं वादन त्याला ऐकू यायचं कमी व्हायला लागलं. आपल्याला ऐकायला यायचं बंद झालं तर आपलं पुढे काय होणार, हा प्रश्न त्याला सतावू लागला. आपल्याला ऐकू यायचं कमी झालंय हे इतरांपासून लपवण्यासाठी तो शक्य तितके प्रयत्न करायला लागला. कारण लोकांना कळलं तर आपलं संगीतातलं करीअर संपेल असं त्याला वाटायचं. मग इतर लोकांमध्ये मिसळायचं त्यानं बंदच केलं.
याच काळात बिथोव्हनला व्हिएन्नामध्ये एका नव्या विद्यार्थिनीला पियानो शिकवायचं काम मिळालं. या विद्यार्थिनीचं नाव होतं ज्युलिएटा. ज्युलिएटा उच्च घराण्यातली होती. 17 वर्षांची ज्युलिएटा देखणी आणि बुद्धिमान होती. बिथोव्हन नकळत तिच्या प्रेमात पडला. बिथोव्हन कितीही मोठा संगीतकार असला तरी तो सामान्य लोकांमध्ये गणला जायचा. ज्युलिएटाच्या घराण्याशी त्याची बरोबरी होणं अशक्य होतं. ज्युलिएटाविषयीच्या भावना बिथोव्हनच्या संगीत रचनांमधून व्यक्त व्हायच्या. या काळात त्याने केलेल्या रचनांपैकी एक रचना ज्युलिएटाला समर्पित केली. ही रचना होती ‘मूनलाईट सोनाटा.’
बिथोव्हनने पियानोवर वाजवण्यासाठी अनेक सोनाटा रचले. त्यातला ‘मूनलाईट सोनाटा’ हा चौदावा सोनाटा. बिथोव्हनने हा सोनाटा रचला तेव्हा त्याचं ‘मूनलाईट सोनाटा’ असं नाव दिलं नव्हतं. तर Sonata quasi una fantasia (म्हणजे ‘फँटसी’च्या शैलीत असणारा सोनाटा) असा उल्लेख केला होता.
या सोनाटामध्ये एकूण तीन रचना येतात. यातली खऱया अर्थाने अजरामर झाली ती पहिली रचना. सोनाटाची पहिली मुव्हमेंट बहुतेक वेळा जलद गतीची असते, पण बिथोव्हनने या सोनाटात पहिली मुव्हमेंट संथगतीची घेऊन काहीतरी वेगळं केलं होतं. या रचनेत आपल्याला बिथोव्हनचं भावविश्व दिसतं. एका बाजूला ऐकण्याचे प्रॉब्लेम्स, संगीतातलं करीअर संपण्याची भीती तर दुसऱया बाजूला मिळू न शकणारं प्रेम अशी बिथोव्हनची मनःस्थिती होती. त्याच्या या यातना मुनलाईट सोनाटामध्ये प्रतिबिंबित होत होत्या. उजव्या हाताने मुख्य मेलडी वाजताना डाव्या हाताने तीन-तीन स्वरांच्या समूहाची विशिष्ट पॅटर्नमध्ये मिळणारी साथ संगीतरचनेला वेगळ्याच उंचीवर नेत होती.
सोनाटामधल्या दुसऱ्या मुव्हमेंटमधलं संगीत एखाद्या नृत्यसंगीतासारखं आहे. बिथोव्हनच्या नैराश्यपूर्ण आयुष्यात असणारा आशेचा किरण या रचनेत पाहायला मिळतो. तिसऱया रचनेत बिथोव्हनच्या वैफल्य, राग आणि निश्चय यासारख्या भावना दिसतात.
बिथोव्हनचा हा सोनाटा सगळ्या युरोपमध्ये प्रचंडच लोकप्रिय झाला. त्याच्या या रचनेने संगीतरचनांच्या रूढ मर्यादा ओलांडल्या होत्या. बिथोव्हनच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी लुडविग रेलस्टॅब नावाच्या कवीने बिथोव्हनच्या रचनेला ‘मूनलाईट सोनाटा’ असं नाव दिलं. कारण ही रचना ऐकताना त्याला स्वित्झर्लंडमधल्या लूसन नावाच्या निसर्गसौंदर्य असणाऱ्या तळ्यात चंद्रप्रकाश पाहत असल्याच्या अनुभवासारखा वाटला. त्यानंतर हा सोनाटा ‘मूनलाईट सोनाटा’ या नावानेच ओळखला जाऊ लागला. गेल्या सव्वादोनशे वर्षांमध्ये त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आपण यूटय़ूबवर जाऊन `Beethoven Moonlight Sonata` ही संगीतरचना नक्कीच ऐकायला हवी!