Published on
:
25 Nov 2024, 12:46 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:46 am
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मनोज घोरपडे यांनी बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व मोडून काढत उत्तरेतील ‘पाटील’की आपल्याकडे खेचून आणली. यामध्ये भाजपाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार एकास एक उमेदवार देण्याचा फॉर्म्युला यशस्वी ठरला असून मतदारसंघामध्ये रामकृष्ण वेताळ यांच्या साथीने मनोज घोरपडे यांनी धैर्यशील कदम यांच्याबरोबर मतदार संघात केलेली व्यूहरचना त्यांना दणदणीत विजयापर्यंत घेऊन गेली.
याशिवाय मनोज घोरपडे यांनी केलेले सूक्ष्म प्लॅनिंग, राबवलेली यंत्रणा व कार्यकर्त्यांना दिलेला विश्वास यातून त्यांचा विजय सोपा झाला. तर बाळासाहेब पाटील यांचा आमदारकीचा षटकार हुकला. विरोधकांच्या एकजुटीने कराड उत्तरचा बाळासाहेबांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. बाळासाहेब पाटील गटाला या निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला असून त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आजवर राष्ट्रवादीचा पर्यायाने माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा बालेकिल्ला राहिला आहे. हा मतदारसंघ स्व. यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा आहे. या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बाळासाहेब पाटील यांनी नेहमीच कराड उत्तरचे प्रतिनिधित्व केले आहे. ते यापूर्वी पाच वेळा आमदार म्हणून याच मतदारसंघातून निवडून गेले आहेत. गत पंचवार्षिक कालावधीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राहिले आहे. तरीही त्यांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले. बाळासाहेब पाटील गटाला प्रामुख्याने अति आत्मविश्वास नडला असून विरोधकांची एकजूट व त्यांनी कार्यकर्त्यांची बांधलेली मोट हे त्यांच्या विजयाला बळ देणारे ठरले.
मनोज घोरपडे यांनी विधानसभा निवडणूक लागण्या पूर्वीपासूनच मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत संपर्क वाढविला होता. गत 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मत विभागणीचा फटका बसून मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांनाही पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घातले. त्यामध्ये त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी कोणाला द्यायचे? कोणाचे पुनर्वसन करायचे? कोणाला कोणता फायदा करून द्यायचा? याचे आडाके बांधून त्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले. निवडणुकीची वेळ जवळ येईल तसतसे वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या तयारीला वेग आला होता. त्यातूनच मग मतदार संघात मनोज घोरपडे, धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांची प्रत्येक निवडणुकीवेळी विभागली जाणारी ताकद या वेळेला एकत्रित आणण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले.
त्यातूनच मग त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात एकास एक व तुल्यबळ असा मनोज घोरपडे यांचा पर्याय निवडला. घोरपडे यांनीही राष्ट्रवादीचा व बाळासाहेबांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना पक्षाचे पाठबळ व धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची साथ मिळत गेली. मनोज घोरपडे यांनी मतदारसंघात महिला संघटन करून त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले. याशिवाय राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करत जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ मिळवून दिला. मनोजबंध मंचाच्या माध्यमातून केलेले काम, शेतकर्यांना शेती पंप सवलतीत देण्याची राबवलेली योजना, याशिवाय प्रत्येक गावात दुसर्या व तिसर्या फळीमध्ये तयार केलेले कार्यकर्ते यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलेली ताकद, याशिवाय वृद्ध, युवा यांच्याशी ठेवलेला संपर्क तसेच निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात दिलेला हिंदुत्वाचा नारा मनोज घोरपडे यांना दणदणीत विजयापर्यंत घेऊन गेला.
याशिवाय जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील व माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांच्यामध्ये झालेली लढत व त्यामध्ये उत्तरेतील भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी उदयसिंह पाटील यांना केलेले सहकार्य हे जगजाहीर होते. त्यातूनच मग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील यांचा पराभव झाला असला तरी त्यावेळी केलेल्या सहकार्याची परतफेड करण्यासाठी व पराभवाचा बदला घेण्यासाठी उंडाळकर यांचे कराड उत्तर मधील कार्यकर्ते उघडपणे निवडणूक अन् रंगात आली असताना मनोज घोरपडे यांच्या प्रचारात सहभागी झाले. त्याचाही मनोज घोरपडे यांच्या विजयात मोठा वाटा आहे.
त्यामुळे ही निवडणूक गेली पंचवीस वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावर प्रभुत्व गाजवणार्या बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना जमिनीवर आणणारी व आत्मपरीक्षण करायला लावणारी ठरली असून भाजपाच्या गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना एकास एक उमेदवारीच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याला यश देणारी ठरली आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपाच्या मनोज घोरपडे यांनी उद्ध्वस्त केला असून कराड उत्तरच्या बालेकिल्ल्यावर घोरपडेंनी पकड घट्ट करत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना धैर्यशील कदम व रामकृष्ण वेताळ यांची साथ व सहकार्य लाभले आहे.