संभाजीराजे छत्रपती सभाPudhari
Published on
:
18 Nov 2024, 9:57 am
Updated on
:
18 Nov 2024, 9:57 am
स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली तरीही आज दलित वस्त्यांची अवस्था वाईट आहे. पिंपरीमध्ये प्रस्थापित आमदारांनी इतकी वर्षे काय केले ? ते विकासावर का बोलत नाही ? पिंपरी-चिंचवड सर्वांत श्रीमंत महापालिका असताना तिचा वापर फक्त टीडीआर घोटाळा करण्यासाठी केला जात आहे. दलित बांधवांना चांगली घरे देण्यासाठी ‘एसआरए’ प्रकल्प का राबवला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला.
परिवर्तन महाशक्तीचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पिंपरी मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ व चिंचवडचे उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारार्थ पिंपरीत जाहीर सभा झाली. त्यावेळी संभाजीराजे बोलत होते. सभेस उमेदवारांसह ऑल इंडिया पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार, स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे, प्रचार प्रमुख सचिन सकाटे आदी उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले की, प्रस्थापित लोकांनी तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला आहे. आमदार होण्याची स्वप्ने विस्थापित लोकांनी बघायची नाहीत का ? त्यांना आमदार होता यावे यासाठीच स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे.
प्रस्थापितांकडे पैसा असला तरी विस्थापितांकडे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे उभे राहा. पिंपरी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने दिलेले दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहेत. ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही. येथील आमदार विकासावर बोलत नाहीत. तुमचे कोणतेही प्रश्न ते सोडवत नाहीत. याला जबाबदार तुम्ही आहात. कारण तुम्ही आवाज उठवत नाही. त्यामुळे आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. नोटा वाटून मत विकत घेणार्या नाही तर सुसंस्कृत राजकारण करणार्यांच्या मागे उभे राहा. बाळासाहेब ओव्हाळ आणि मारुती भापकरांना निवडून द्या.