लोणंद : दै.‘पुढारी’ च्या माध्यमातून पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम घेण्यात आली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची वाट सुकर व्हायला मदत होणार आहे. ‘पुढारी’ चा उपक्रम निश्चितच मार्गदर्शक ठरला असून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनात विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ‘पुढारी’च्या या परीक्षेचा निश्चितपणे उपयोग होईल, असा विश्वास लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले यांनी व्यक्त केला.
लोणंद येथील कन्याशाळेमध्ये दै. ‘पुढारी’च्या ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ परीक्षेचा खंडाळा तालुक्याचा बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी लोणंद बाजार समिती सभापती सुनील शेळके, मुख्याध्यापिका सुनंदा नेवसे, माजी नगरसेविका दिपाली क्षीरसागर, ‘पुढारी’चे जिल्हा वितरण विभाग प्रमुख संजय पोतदार, तालुका प्रतिनिधी शशिकांत जाधव, पर्यवेक्षक नेवसे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
दै.‘पुढारी’च्या या उपक्रमाचे कौतुक करत सपोनि भोसले म्हणाले, स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना कशाप्रकारे तयारी करायची, याची माहिती ‘पुढारी’ने मुलांना करून दिली. याचा उपयोग त्यांना भविष्यात होणार आहे, असे सांगितले. सुनील शेळके म्हणाले, दै.‘पुढारी’ने विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने मुलांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे. या परिक्षेतून मुलांच्या स्पर्धा परीक्षेचाही सराव झाला. सुनंदा नेवसे म्हणाल्या, या स्पर्धेच्या युगात शाळांमध्ये विविध परीक्षा घेतल्या जात आहेत. त्यामध्ये दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेली पुढारी टॅलेंट सर्च परिक्षा चांगल्या प्रकारे आयोजित केली होती.
या परीक्षेद्वारे मुलांना प्रोत्साहन मिळाले. यावेळी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या आराध्या बांडे, तालुकास्तरावरील विजेत्या आराध्या करंजे, अनुष्का क्षीरसागर, शंभूराजे अलगुडे, आराध्या लोळे, शर्वरी जाधव, आरोही राऊत, सुखदा कदम, आदिल आतार, शिवांशी करचे, ऋत्वी धुलगुडे, श्रुती चव्हाण, प्रसन्ना महामुनी, वेदांती गायकवाड, मोहित रामराजे, गायत्री घाडगे, झिशान काझी, श्रेयस जाधव, ओमकार बनसोडे यांच्यासह पालक व शिक्षकांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तर हर्ष चौधरी, श्रुती जाधव, विनया सोनवले, अन्वी काटकर, मृण्मयी जमदाडे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
खंडाळा तालुका प्रतिनिधी शशिकांत जाधव यांनी प्रास्तविक केले. ज्योती पवार यांनी सूत्रसंचलन केले. लक्ष्मण नेवसे यांनी आभार मानले. दरम्यान, यावेळी दै. ‘पुढारी’च्यावतीने ‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’ मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी, शिक्षक पालक उपस्थित होते.