पुढार्यांच्या चुकांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट; संभाजीराजे यांची टीकाFile photo
Published on
:
24 Jan 2025, 5:30 am
Updated on
:
24 Jan 2025, 5:30 am
पुणे: क्रांतिसिंह नाना पाटील हे बीडमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तेव्हाचे सुसंस्कृत बीड आज राहिले नाही. सद्य:स्थितीत बीडमध्ये आज टोळ्या फिरताना दिसत आहेत. चूक तिथल्या नागरिकांची नसून पुढार्यांची आहे. पुढार्यांच्या चुकांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लागल्याची खंत माजी खासदार संभाजीराजे यांनी बीड आणि राज्याच्या परिस्थितीवर गुरुवारी (दि.23) व्यक्त केली.
महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्रसेवा समूह, रयत प्रकाशन आणि गिरिप्रेमी ग्रुप यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात संभाजीराजे बोलत होते. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या राज्यातील विविध शहरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सनदी अधिकारी विपुल वाघमारे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, श्रीराम शिक्षण संस्थेच्या श्रीलेखा पाटील, उद्योजक गणेश माने देशमुख, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिक्षण निरीक्षक रावसाहेब मिरगणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे नेते शिवाजीराव खांडेकर, महेश शिंदे, योगेश निंबाळकर आदी उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, शाळांमधील विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. भविष्यातील समाजासाठी विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी घेतली, तर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाहीत. सध्याची शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती पाहता शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते तुटत आहे.
हे नाते पुन्हा जुळायला हवे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याचे काम चांगल्या शिक्षणाने होणार आहे. सरकारने सरकारी शाळांना पायाभूत सुविधा पुरवायल्या हव्यात. शिक्षकांना निवडणुकीची कामे द्यायची काय आवश्यकता आहे? सध्या शिक्षक शिक्षणाचे काम सोडून सर्वच कामे करतात. या परिस्थितीत त्यांना शिकवण्यासाठी वेळ कधी मिळणार, असा प्रश्नही संभाजीराजेनी उपस्थित केला.
वाघमारे म्हणाले, शिक्षक केवळ रोजगारासाठी व्यक्ती तयार करण्याचे काम करतो. मात्र, आता त्यांनी चाकोरीच्या त्यापलीकडे जाऊन रोजगारनिर्मिती करणारे व्यक्ती घडविण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी शिक्षणाची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी फिनलंड शिक्षण व्यवस्था, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्थिक साक्षरता अशा विषयांची माहिती घेऊन, ती विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. प्रास्ताविक औदुंबर लोंढे यांनी केले.