हा पाहा नदीकाठ, किती बकाल झालाय!Pudhari
Published on
:
24 Jan 2025, 8:44 am
Updated on
:
24 Jan 2025, 8:44 am
पुणे: हा पाहा नदीकाठ, किती बकाल झालाय..! आता उरल्यासुरल्या मोठ्या झाडांना मार्किंग केले आहे. ही झाडे वाचणार आहेत की नाहीत, सांगा...? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार पर्यावरणप्रेमी नागरिकांंनी महापालिका आयुक्तांवर गुरुवारी (दि. 23) केला.
शहरातील नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाच्या सद्यःस्थितीबाबत खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी सकाळी बाणेर येथील राम-मुळा संगमाला भेट देऊन पाहणी केली. पर्यावरणाचे अतोनात नुकसान आणि पुराचा धोका वाढणार असल्याचे या पाहणीत आढळून आले. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांसमवेत विभागीय आयुक्त यांची एकत्रित बैठक घ्या, अशी सूचना खा. कुलकर्णी यांनी या वेळी केली.
नदीपात्रावर पालिका अधिकार्यांची टीम
शहरातील निसर्गप्रेमी, नागरिक आणि पुणे रिव्हर रिव्हायव्हल समूहाने नदीकाठ विकास प्रकल्पाबाबत खा. कुलकर्णी यांच्याकडे तक्रारी केल्या. या वेळी मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पर्यावरण विभाग उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त अविनाश संकपाळ, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, प्रकल्प विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
वाकड भागातील काम थांबवा
नदीकाठच्या झुडपांचे महत्त्व डॉ. विनया घाटे, प्रा. अजय फाटक यांनी विशद केले. सध्या वाकड ते सांगवी भागात काम चालू आहे. तो भाग पूरप्रवण आहे, असे पर्यावरण अभ्यासक पुष्कर कुलकर्णी यांनी सांगितले. खा. कुलुकर्णी यांनी दखल घेत, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांना फोन केला. पुढील चर्चा होईपर्यंत नदी पात्रातील काम थांबविण्याच्या सूचना दिल्या.
ही झाडे कापली जाणार का?
नदीकाठच्या संवेदनशील भागातील शेकडो वर्षे वयाच्या दुर्मीळ झाडांना महापालिकेतर्फे टॅगिंग केले आहे. ही झाडे कापली जाणार का? अशी चिंता शुभा कुलकर्णी, आरती म्हसकर यांनी मनापा आयुक्तांकडे व्यक्त केली. नदीमध्ये सोडण्यात येणार्या प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची चिंता स्थानिक नागरिक कणसे यांनी व्यक्त केली.
डिझाइन तयार नसताना कामे दिली कशी?
प्रकल्पाचा डीपीआर तयार असला तरी डिझाइन अजून झालेले नाही, असे पुणे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे नक्की काय तयार आहे आणि काय नाही? डिझाइन नसताना कंत्राटे कशी दिली, असे प्रश्न नागरिकांसह कुलकुर्णी यांनी उपस्थित केले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने करता येऊ शकतो. त्याचा नमुना मनपाला दिला आहे, अशी माहिती जीवित नदी संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे तसेच डॉ. गबाले यांनी दिली. प्राजक्ता महाजन, रूपेश केसेकर, अजय फाटक, चैतन्य केट, मेघना भंडारी, अमेय जगताप यांनीही चर्चा केली.