‘विश्व मराठी संमेलन राज्यातील विविध ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला असून पुढील संमेलन नाशिकमध्ये घेतले जाईल,’ असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
तिसऱया विश्व मराठी संमेलनाची सांगता आज झाली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना ‘कलारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, काँग्रेस नेते उल्हास पवार, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
मराठीसाठी राजकारण सोडून सर्वांनी एकत्र या – राज ठाकरे
राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक यांनी मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास, कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आजही हिमाचल, आसामात इतर राज्यांतील व्यक्ती जमीन विकत घेऊ शकत नाहीत. अशा वेळी महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली खासगी पंपन्या, उद्योजकांना का मोकळीक दिली आहे?’ असा सवाल त्यांनी केला.