पुण्यात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच; सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड Pudhari
Published on
:
07 Feb 2025, 2:52 am
Updated on
:
07 Feb 2025, 2:52 am
पुणे/ येरवडा: पुणे शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर, तिरंगा चौक आणि कसबा पेठेतील राम- रहिम मित्रमंडळाच्या परिसरात वाहने फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येरवडा आणि फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, फरासखाना पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. येरवड्यात बारा रिक्षा, दोन दुचाकी आणि एका जेसीबीची काच फोडण्यात आली आहे. तर एक रिक्षा, बुलेटचे नुकसान केले असून, काही दुचाकी ढकलून देण्यात आल्या आहेत.
येरवडा पोलिसांनी वाहने फोडल्याप्रकणी सयाजी डोलारे (वय 23) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अबुबकर रज्जाक पिरजादे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.6) पहाटे अडीच ते पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
डोलारे याने दारूच्या नशेत ही वाहने फोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डोलारे हा रात्री येथील तिरंगा चौकात आला होता. त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बारा रिक्षाच्या काचा, दोन दुचाकी आणि एका जेसीबीची काच लोखंडी हत्याराने फोडली.हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत येरवडा पोलिसांना माहिती दिली. डोलारे अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
तर कसबा पेठेतील राम- रहिम मित्रमंडळ परिसरातदेखील टोळक्याने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वाहने फोडली आहेत. एक रिक्षा आणि काही दुचाकींचे यामध्ये नुकसान झाले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.