Published on
:
20 Jan 2025, 8:22 am
Updated on
:
20 Jan 2025, 8:22 am
कडा : आष्टी तालुक्यातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग साबलखेड ते आष्टी या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम चालू आहे. अनेकदा निवेदने देऊनही ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. (Beed News)
या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पैठण - बारामती रोड जात असून या रोडवरून मिरजगाव मार्गे ऊस वाहतूक मोठया प्रमाणात होत असते. अगदी कडा शहरापासून काही अंतरावर गेल्यावर शेरी बु. येथे जोडणाऱ्या बारामती रोडवर भले मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे रात्री अपरात्री वाहनधारकाच्या लक्षात न आल्यास मोठ्या अपघाताची शक्यता आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने दुरुस्ती करून खड्डा बुजविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक सोनवणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. (Beed News)
नव्याने झालेल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर कोणतेही दिशा दर्शक फलक नाहीत. धोक्याच्या ठिकाणी मोठमोठे पुलाचे काम चालू असून त्याठिकाणी फक्त रेबिन बांधल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. काही ठिकाणी चांगला रोड झाल्याने अपघात होण्यास अतिवेग हे जरी मोठ्या प्रमाणात कारण असले तरी वाहनधारकांचा निष्काळजीपणा, ओव्हरटेक करणे, खड्डे चुकविण्याच्या नादात चुकीच्या दिशेने प्रवेश अथवा वाहन चालवणे, पुलाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसणे. त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे रस्ते जागोजागी रखडलेले अपूर्ण रस्ते हे सुद्धा अपघाताचे प्रमुख कारण बनले आहे. रात्री लाईट मुळे दिशादर्शक फलक दिसत नसल्याने अचानक वळण्याने अपघात घडतात. त्यामुळे वाहन धारकांतून संताप व्यक्त होत आहे.