Published on
:
20 Jan 2025, 11:10 am
Updated on
:
20 Jan 2025, 11:10 am
नागपूर : मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचे पालकमंत्री पद मिळाले असते तर बीडची अधिकाधिक सेवा करण्याची संधी मला मिळाली असती. अधिकच आनंद झाला असता किंबहुना माझा पाच वर्षातील कार्यकाळ बीडसाठी सर्वाधिक विकसनशील राहिला आहे. असा दावा पर्यावरण मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आल्यानंतर केला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुपारी त्या श्रीक्षेत्र माहूरला जात असून रात्री आल्यानंतर मुंबईला रवाना होणार आहेत.
महायुतीत सध्या पालकमंत्री पदावरून राजी नाराजी पाहायला मिळत आहे. नाशिक, रायगड पालकमंत्रीपद घोषणेला स्थगिती दिली गेली आहे. या संदर्भात मला त्यांची काही कल्पना नाही असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. जालनाचे पालकमंत्रीपद मला मिळाले. जालना पण माझ्यासाठी नवीन नाही. यासंदर्भात मी अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येकवेळी आपल्याला हवी असलेली जबाबदारी मिळतेच असे नाही.
गेली 5 वर्षे संघटनात्मक जबाबदारी होती. मला दरवेळी मिळालेली संधी माझ्यासाठी नवा अनुभव समजून मी घेत असते असेही स्पष्ट केले. मात्र आता झालेल्या निर्णयाला कोणतीही असहमती न दर्शविता मिळालेल्या संधीप्रमाणे जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जालन्यासोबत बीडकडे दुहेरी लक्ष मला द्यावे लागेल. बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत ते आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्याबाबत छेडले असता कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही माझ्या भूमिकेवर मी बोलू शकेल अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.