शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. “भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री कोण बनणार? कोणता बंगला कुणाला मिळणार? यावरुन भांडणं सुरु झाले असतील, तर जनतेने यातून समजायचं तरी काय? बरं ही स्थगिती कुणाच्या हट्टापोटी दिलेली आहे? ज्यांच्या कार्यकाळात एसटीचा घोटाळा, सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असं कळतंय, पण त्यांच्याच कार्यकाळात घोटाळा झालं असं कळतंय. मग कुणीतरी जावून टायर जाळतो. खरंतर अशाप्रकारे जाळपोळ करुन अशी स्थगिती येत असतील, अशी पालकमंत्रीपदं मिळत असतील तर हे चुकीचं आहे. अशा मंत्र्यांना लगेच मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“हा हावरापणा बरा नाही, हा स्वार्थीपणा बरा नाही. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, जे मुख्यमंत्री कुणापुढे झुकत नव्हते, ते झुकतात कसे आणि एवढी दादगिरी सहन करतात कसे? हा एक प्रश्न आहे. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे संख्याबळ आहे, त्यांना दादागिरी सहन करायची गरज नाही. पण त्यांनी दादागिरी सहन करण्याचं पहिलं पाऊल टाकलं आहे. ही सुरवे-फुगवे, नाराजी कितपत चालू देणार, असं सरकार चालत असेल तर जनतेची कितपत सेवा होणार याचा जनतेने विचार करावा”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
‘पोलिसांना मोकळं मैदान दिलं तर…’
“दुसरी गोष्ट, पोलिसांनी काल चातुर्य दाखवून सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडलं आहे. त्याला पकडल्यानंतर अनेक गोष्टी लोकांसमोर येत आहेत. त्याला कसं पकडलं? कुठे पकडलं? बांगलादेशी होता हे आता लोकांसमोर येत आहे. पण यातून आपल्याला एक कळतं, पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना मोकळं मैदान दिलं आणि गृह खात्याने पोलिसांचे हात बांधले नाहीत तर पोलीस कुठेही जावून कुणीही गुन्हेगार असेल त्याला पकडून कोर्टासमोर हजर करु शकतात. पोलिसांना मोकळे हात दिले तर ते काहीही करु शकतात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘सरकारची इच्छाच नसेल तर वाल्मिक कराड सारख्या लोकांना…’
“एकीकडे गृहखात्याला मोकळे हात दिले जात आहेत, तर दुसरीकडे गृह खातं आणि सरकारची इच्छाच नसेल तर वाल्मिक कराड सारख्या लोकांना पोलीस पकडून शकले नाही. त्यांना शरण यावं लागलं. कारण गृहखात्याच्या मनात इच्छा आहे की नाही? हा प्रश्न आहे. मी सैफ अली खान प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल धन्यावाद मानतो. बांगलादेशमधून ती व्यक्ती आपल्या देशात घुसलीच कशी?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
‘एका बाजूने चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेशी’
“भाजपने बांगलादेशी हटाव मोर्चा काढला. पण गेल्या 11 वर्षांपासून कुणाचं सरकार आहे? केंद्रात आणि राज्यात गृहमंत्री भाजपचे आहेत. आज जे भाजपचे लोकं मोर्चा काढत असतील, त्यांना मी एकच सांगेल की, आपण एकत्र येऊन मोर्चा काढूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं पाहिजे की, आपलं सरकार अकार्यक्षम आहे का? आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करु शकत नाहीत का? तुमच्या सरकारच्या काळात बांगलादेशातून येऊच कसा शकतो? एका बाजूने चीन घुसत आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेशी घुसत आहेत, तर बांगलादेशात हिंदू आक्रोश करत आहेत. तिथे भाजप जाऊ शकत नाहीत. केंद्र सरकार काहीच करु शकत नाही”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.