बँक्वेट हॉलमध्ये एका युवतीचा लग्नसोहळा सुरु होता. त्याचवेळी गौतमबुद्ध नगरमध्ये राहणारा तिचा एक्स बॉयफ्रेंड अनिल प्रजापती (24) कार घेऊन तिथे पोहोचला. त्याने बँक्वेट हॉल बाहेर कार उभी केली. प्रेयसीच दुसऱ्या कोणासोबत लग्न होतय हे त्याला सहन झालं नाही. त्याने तिथेच स्वत:च्या अंगावर पेट्रोल शिंपडून पेटवून घेतलं. अनिलचा यामध्ये मृत्यू झाला. दिल्लीच्या गाजीपूरमधील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे 14 फेब्रुवारीला अनिल आणि त्याचा लहान भाऊ सोविंद्र यांचं दुसऱ्या मुलींसोबत लग्न होणार होतं. गाजीपूर पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे. पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. अनिलची वॅगनार कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केला.
अनिल कुमार आपल्या कुटुंबासह गौतमबुद्ध नगरच्या नवादा गावात राहत होता. कुटुंबात वडील, आई, मोठा भाऊ सुमित आणि लहान भाऊ सोविंद्र आहे. तो गौतमबुद्ध नगर येथील एका कंपनीत नोकरीला होता. जिल्हा पोलीस उपायुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितलं की, शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. गाजीपूर येथील बँक्वेट हॉलच्या बाहेर कारमध्ये एका युवकाने स्वत:ला पेटवून घेतलं. लोकांनी कारची काच फोडून युवकाला बाहेर काढलं. अनिल बऱ्याचप्रमाणात आगीच्या ज्वाळांमध्ये होरपळला. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवकाला एलबीएस रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी अनिलला मृत घोषित केलं.
लग्नाची कार्ड वाटायला गेलेला
पोलीस तपासात समोर आलं की, अनिल एका मुलीवर प्रेम करत होता. पण तिच्या घरच्यांनी दुसरीकडे लग्न ठरवलेलं. शनिवारी जेव्हा बँक्वेट हॉलमध्ये मुलीच लग्न सुरु होतं. त्याचवेळी अनिलने स्वत: जीवन संपवलं. मृत अनिलचा भाऊ सोविंद्रने सांगितलं की, 14 फेब्रुवारीला अनिलच लग्न होणार होतं. शनिवारी त्याचा भाऊ अनिल ड्युटीवर गेला होता. संध्याकाळी पाचनंतर तो कार्ड वाटण्यासाठी कारने दिल्लीला आला होता. रात्री 10 वाजता फोनवर त्याचं भावासोबत बोलणं झालं. त्यावेळी तो पटपडगंज येथे कार्ड वाटत होता. रात्री 11.30 वाजता अनिल घरी आला नाही, त्यावेळी कुटुंबाने फोन केला. पण फोन बंद होता.
लग्नाच्या कार्डवरुन पोलिसांचा फोन
रात्री एक वाजता दिल्ली पोलिसांनी लग्नाच्या कार्डवरील फोन नंबरवरुन कुटुंबाला फोन केला. अनिलच्या कारला आग लागली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याच सांगितलं. सोविंद्रचा आरोप आहे की, कारला आग लागली असती. तर कार पूर्ण जळाली असती. पण कारचा पुढचा भाग जळाला आहे. त्याने भावाची हत्या झाल्याची शंका व्यक्त केली आहे