शिरूर-हवेलीच्या आमदारांसमोर प्रलंबित कामांचे आव्हानFile Photo
Published on
:
20 Jan 2025, 11:11 am
Updated on
:
20 Jan 2025, 11:11 am
टाकळी भीमा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर-हवेली मतदारसंघातील मतदारांनी आमदारपदी ज्ञानेश्वर कटके यांच्या रूपाने नव्या चेहर्याला कौल दिला. आगामी पाच वर्षांत मतदारसंघातील जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांसह मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आव्हान आ. कटके यांच्यासमोर असणार आहे.
शिरूर-हवेली मतदारसंघात तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. उद्योजकांच्या समस्या मोठ्या आहेत. प्रदूषणाचा प्रश्नही सतावत आहे. काही भागात शेती सिंचनाचा अभाव आहे. शिरूर तालुक्यातील गावागावांतील मंजूर जलजीवन नळपाणी पुरवठा योजनांची कामे मुदत संपत आली तरी पूर्ण झालेली नाहीत.
संबंधित कामे करणार्या ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढत आहे. शेती शिवारात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. प्रशासकीय अधिकार्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजात दिरंगाई होत आहे. आता हे विविध प्रश्न सोडविण्याचे आव्हान आमदार कटके यांच्या समोर आहे.
रस्ते, बेरोजगारीचा मोठा प्रश्न
शिरूर मतदारसंघात नवे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सोबतच अनेकांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे पाहिजे तसे पसरलेले नाही. एकही मोठा नवीन उद्योग या मतदारसंघात आलेला नाही. बेरोजगारांची स्थानिक उद्योजकांकडून थट्टा सुरू आहे. उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार न मिळणे हा विषय गंभीर बनला आहे.
कारखान्यांचे वाढते प्रदूषण, पाणी प्रश्न
तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील विविध उद्योगांमुळे कारखान्यांचे प्रदूषणही वाढत आहे. उद्योगामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आधीच्या लोकप्रतिनिधींना यश आले नाही. यासोबतच या मतदारसंघातून भीमा नदी, मुळा-मुठा, इंद्रायणी, घोड, वेळ या नद्या वाहतात, असे असताना शेती सिंचनासाठी कायमची उपाययोजना नाही. मतदारसंघातील अनेक गावे कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहेत, त्यांना वेळेवर पाणी मिळणे गरजेचे आहे.
‘घोडगंगा’ सुरू होणार का?
ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी कामधेनू ठरलेला घोडगंगा कारखाना बंद आहे. परिणामी, ऊस उत्पादक शेतकर्यांसमोर गाळपाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. हा कारखाना सुरू करण्याचे आव्हानही आमदार कटके यांच्यासमोर आहे. गावातील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण न झाल्याने अनेक गावांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहेत.
अधिकार्यांची याकडे डोळे झाक होते. यावर नवीन आमदारांनी तत्काळ लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा मतदारसंघातील नागरिकांना आहे. तसेच पाणंद रस्ते, विजेच्या समस्या, शिक्षण, आरोग्य, भूसंपादन, कॅनॉलच्या पोटचार्यांची कामे, बिबट्यांचे वाढते प्रमाण, महामार्गावरील वाहतूक कोंडी आदी प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हानही आ. कटके यांच्यासमोर आहे.