Published on
:
19 Nov 2024, 4:01 am
Updated on
:
19 Nov 2024, 4:01 am
म्युच्युअल फंडमध्येच आणखी एक श्रेणी इंटरनॅशनल फंडची असते. या श्रेणीत गुंतवणूक करत पोर्टफोलिओत विविधता आणता येते. प्रत्येक गुंतवणूकदार हा कमीत कमी जोखीम असलेल्या आर्थिक साधनांत गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो. त्याचबरोबर चांगला परतावा मिळण्याचीदेखील इच्छा बाळगून असतो. यासाठी गुंतवणुकीत वैविध्यपणा कसा राहील, याचा तो विचार करत असते.
इंटरनॅशनल फंडस् म्हणजे केवळ परकी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत गुंतवणूकदारांना अधिकाधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही एखाद्या देशांतर्गत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर आपले भांडवल भारतीय शेअर बाजारातील लिस्टड रिलायन्स, एचडीएफसी, भारतीय स्टेट बँक किंवा इन्फोसिससारख्या भारतीय कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक होईल; परंतु इंटरनॅशनल फंडस्मध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड हे अॅमेझॉन, गुगल, फेसबुक, अॅपल आणि अलीबाबासारख्या समूहाच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात.
काही आंतरराष्ट्रीय फंडस् अमेरिकी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, तर काही चीनच्या कंपन्यांतील शेअरध्ये पैसे गुंतवत असतात. शिवाय काही रक्कम बहुराष्ट्रीय कंपन्या मग त्या कोणत्या का देशात असेना, त्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक होते.
एआयसारखे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर जगभरातील टेक्नॉलॉजी वेगाने विकसित होत आहे. एकीकडे अॅपल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे फेसबुक, गुगलसारख्या कंपन्यादेखील उच्चांक गाठत आहेत. यानुसार तुम्ही इंटरनॅशनल इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर त्याचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर काही काळापासून डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने देशांतर्गत शेअर बाजाराचे नुकसान झाले आहे. याउलट डॉलरची किंमत वाढल्याने इंटरनॅशनल इक्विटी म्युच्युअल फंडने दमदार कामगिरी केली आहे.
बहुतांश इक्विटी म्युच्युअल फंडस्ने गेल्या एक वर्षात चांगली कामगिरी केली; परंतु आंतरराष्ट्रीय इक्विटी म्युच्युअल फंडदेखील परताव्याच्या आघाडीवर मागे राहिलेला नाही. मोतीलाल ओसवाल नॅस्डेक 100 एफओए योजनेने गेल्या पाच वर्षांत सरासरी 21 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे इन्वेस्को ग्लोबलनेदेखील 18 टक्के परतावा दिला आहे. एकुणातच देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हे दोघेही दमदार कामगिरी करण्यात मागे नाहीत; पण यानिमित्त एक गोष्ट ध्यानात घ्या आणि ती म्हणजे पोर्टफोलिओत वैविध्यता आणण्यासाठी इंटरनॅशनल फंडचा विचार करणे. या कृतीने साहजिकच पोर्टफोलिओत वैविध्यपणा येईल आणि त्याचा लाभ मिळेल. कारण, देशातील कंपन्या चांगली कामगिरी करत नसतील आणि म्युच्युअल फंड चांगला परतावा देत नसतील, तर इंटरनॅशनल फंडमधून त्याची भरपाई करता येऊ शकते.
पोर्टफोलिओत विविधता आणताना त्यात इंटरनॅशनल फंडस्चा समावेश असणे चांगली बाब आहे; पण त्याचवेळी गरजेपेक्षा अधिक इंटरनॅशनल फंडस्मध्ये गुंतवणूक करण्याचेदेखील टाळले पाहिजे.
इंटरनॅशनल फंडस्मधील जोखीम
इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमधील जोखीम ही वेगळ्या प्रकारची असते. परकी चलन बाजारातील चढ -उतार हे नियामक आणि आर्थिक स्थितीच्या द़ृष्टिकोनावर आधारित असतात आणि त्याप्रमाणे फंडच्या कामगिरीवर परिणाम होत राहतो. इंटरनॅशनल फंडमध्ये गुंतवणूक करताना काही पथ्ये पाळायला हवीत. म्युच्युअल फंडमधील एखादा पोर्टफोलिओ विशिष्ट समूहाच्या शेअरपुरताच मर्यादित असेल, तर तेथे गुंतवणूक करण्याऐवजी पोर्टफोलिओत विविध कंपन्यांचे शेअर असणे फायद्याचे राहू शकते. ज्या गुंतवणूकदारांना काही काळ नुकसान सहन करण्याची क्षमता नाही, त्यांनी या फंडपासून दूर राहिलेलेच बरे; मात्र ज्यांना आपल्या पोर्टफोलिओत वैविध्यपणा आणायचा आहे आणि जोखीम उचलण्याची क्षमता आहे, त्यांनी आपल्या पोर्टफोलिओत दहा ते पंधरा टक्के भाग हा इंटरनॅशनल म्युच्युअल फंडसाठी ठेवायला हरकत नाही.