प्रत्यक्ष मतदानापूर्वीच शहरातील मतदारांच्या बोटाला लागली शाई:सीपी, एसपी, अधिकाऱ्यांसह जिल्ह्यात 10 हजारावर मतदान

6 days ago 2
प्रत्यक्ष निवडणुकीला अजून आठवडाभराचा वेळ असला तरी अमरावती जिल्ह्यात मतपत्रिकेद्वारे (बॅलेट) मतदान सुरू झाले आहे. निवडणूक कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी वेळ मिळत नसल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. या व्यवस्थे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत १० हजार ६३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बोटाला शाई लागली. यात पोलिस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह त्यांच्या यंत्रणेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या आठही विधानसभा मतदारसंघात ११ हजार २४८ अधिकारी, कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत. या सर्वांना ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे (बॅलेट) मतदान करण्याची संधी देण्यात आली असून, तसे हमीपत्रही त्यांच्याकडून भरून घेतले होते. त्यामुळे निवडणूक विषयक प्रशिक्षणावेळीच त्यांचे मतदान करून घेण्यात आले. त्यासाठी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह आणि जिल्ह्यातील आठही निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तात्पुरते मतदान केंद्र स्थापन केले होते. या वेळी धामणगाव रेल्वे मतदारसंघातील १३१६, बडनेरा येथील १४३०, अमरावतीत २२८९, तिवस्यात १०२६, दर्यापुरात ११८०, अचलपुरात १०४७, मोर्शीत ११७९ तर मेळघाटात ११८० अशाप्रकारे १० हजार ६३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केले. मतदानानंतर मतपेट्या बंद केल्या असून, त्या आता मतमोजणीच्या दिवशी उघडल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट : जिल्ह्यात गुरुवारपासून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला सुरुवात झाली. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दर्यापूर मतदारसंघातील जयबुनाबी मोहम्मद अली यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. पाहणीअंती गृह मतदानाच्या प्रक्रियेविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मतदान यंत्र असलेल्या स्ट्राँगरूमचीही त्यांनी पाहणी केली आहे. गृह मतदान करताना ज्येष्ठ मतदार. बॅलेटने होणारे मतदान १६,९७२ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १६ हजार ९७२ मतदारांना मतपत्रिकेद्वारे मतदानाची संधी देण्यात आली आहे. २ हजार ४२२ ज्येष्ठ नागरिक, तर ४४० दिव्यांग मतदार यांच्यासाठी त्यांच्या घरीच मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. तर ११ हजार २४८ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान मतदान केले. अशाप्रकारे एकूण १६ हजार ९७२ मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article