प्रेक्षागृहात सर्वांनी सामुहिकपणे कलेचा आस्वाद घेणे हेच कलेचे सार्थक-प्रा. शिंदे:अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुलासाठी प्रयत्न करणार
1 day ago
1
नाटक रंगमंचावर सादर करणे हा जसा कलेचा आविष्कार आहे, तसेच कलेचा आस्वाद प्रेक्षागृहात सर्वांनी सामुहिकपणे घेणे हे कलेचे सार्थक आहे. समाजात ही बाब रुजवणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास जरी झाला तरी मानवी सृजनशीलतेला ती पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे नाट्यरसिकांचा प्रतिसाद नाट्यसृष्टीला उभारी देणारा ठरेल. शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल आणि संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल, राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली. १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले,ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विश्वस्त अशोक हांडे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, संमेलन प्रमुख क्षितिज झावरे, अध्यक्ष प्रा.प्रसाद बेडेकर आदी उपस्थित होते. सभापती प्रा.शिंदे म्हणाले, १०० व्या नाट्य संमेलनाचा मान सर्व विभागांना देवून प्रादेशिक संमेलन भरवण्याची कल्पना कौतुकास्पद आहे. मराठी रंगभूमी कलाकरांना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यानगरचे नाट्यगृह लवकर उभे करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. नाटकांमधून विविध रसांनी युक्त लोकव्यवहार दिसतात. नाटकात विविध प्रकारच्या प्रेक्षकांना उपयुक्त ठरणारे विचार असतात. नाटक विरंगुळा देण्यासोबत बोधप्रदही असते. मराठी रंगभूमीला वैभवशाली परंपरा लाभली आहे. स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करण्यात मराठी नाटकाचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांची मांडणी मराठी रंगभूमीने केली. सुरुवातीलाच संजोग धोत्रे यांनी लिहिलेल्या व पवन नाईक यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी 'शिदोरी' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यकलेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात दर्जेदार व सर्व सुविधांनी युक्त नाट्यगृहाची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली.प्रास्ताविक प्रसाद बेडेकर यांनी, तर सूत्रसंचालन चैत्राली जावळे यांनी केले. सांस्कृतिक वारशाची जपणूक करणे आवश्यक : डॉ. पटेल अहिल्यानगरसारख्या शहरात सगळ्या कलांना वाव मिळेल, यासाठी सांस्कृतिक संकुलाची आवश्यकता आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठी, लहान नाटकासाठी, नाटक आणि नृत्याच्या तालमीसाठी, ग्रामीण भागातील लघुचित्रपट निर्मिती करणाऱ्या नवतरुणांसाठी सभागृहाची व्यवस्था यात असावी. विविध कलांची दालने असावी. त्यातून लहान गावांपर्यंत ही कलेची चळवळ पोहोचू शकेल. विविध विकासकामांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांस्कृतिक वारशाची जपणूकही करणे आवश्यक आहे, असे डॉ.जब्बार पटेल यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)