‘इश्कबाज’, ‘नागिन’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात बॉयफ्रेंड करण शर्माशी लग्न केलं. लग्नापूर्वी करण आणि सुरभी हे जवळपास 13 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. इतकी वर्षे डेट करूनही लग्नानंतरचा प्रवास सोपा नसतो, अशी भावना सुरभीने व्यक्त केली आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसत आहेत. तर तिच्या मागे उभा असलेला करण तिला हसवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सुरभीने लग्नानंतरचा तिचा अनुभव सांगितला आहे. प्रेयसी ते पत्नी बनणं सोपं नसतं.. असं तिने त्यात म्हटलंय. या पोस्टच्या सुरुवातीलाच तिने नेटकऱ्यांना इशारा दिला की, ‘माझ्या पतीला काही बोलू नका.. तो मला रडवत नाहीये तर हसवण्याचा प्रयत्न करतोय.’
सुरभीची पोस्ट-
‘मी रडकुंडीला आले असताना मला हसवण्यासाठी त्याने हा फोटो क्लिक केला आहे. माझ्या फोनमध्ये मी हा फोटो सेव्ह करून ठेवला आहे. आम्ही इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि यापुढच्या प्रवासात जी फुलं किंवा काटे येतील, त्याला सोबत सामोरं जाणार असल्याची ही एक आठवण आहे. इन्स्टाग्रामवर नेहमी चांगल्याच गोष्टी शेअर केल्या जातात. मोजके सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त होतात. आणखी एक महिना झाला की आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होईल. ही भावनाच विचित्रपणे आनंददायी आहे. पती आणि पत्नी बनून एकत्र आयुष्य जगणं सोपं नाही. तुम्हाला सतत तडजोड करावी लागते, एकमेकांना सांभाळून घ्यावं लागतं. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असताना उलट सोपं असतं’, असं तिने लिहिलंय.
हे सुद्धा वाचा
लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल तिने पुढे म्हटलंय, ‘लग्नानंतर मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण येतेय. वडिलांना आठवून मी अनेकदा रडली. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जात नाही किंवा त्यासाठी तयार केलं जात नाही. तुम्ही एक गोष्ट सावरत असताना दुसरी बिघडते आणि हे चक्र सुरूच राहतं. एकत्र काम करताना आमच्यात मतभेद झाले, अहंकार बाजूला ठेवून एकमेकांना समजून घ्यावं लागलं आणि कुठेतरी सुवर्णमध्य साधावा लागला. जेव्हा गोष्टी आमच्या मनाप्रमाणे घडत नव्हत्या, तेव्हा आम्ही एकमेकांची साथ देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. लग्नानंतरचं पहिलं वर्ष खूप कठीण असतं असं म्हणतात. हे खरंय. तुमच्या जोडीदारासोबत सगळ्या गोष्टी जुळवून घेणं, एकमेकांच्या मताशी सहमत असणं खूप महत्त्वाचं असतं. तेसुद्धा जेव्हा तुम्ही 13-14 वर्षे एकमेकांसोबत असता. आमच्या पालकांनी हे सहजरित्या कसं केलं देवाला माहीत.’
सुरभीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही एका मुलाखतीत सुरभी लग्नानंतरच्या तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “जेव्हा करणसोबत माझं लग्न केलं, तेव्हा सुरुवातीला दोन महिन्यांपर्यंत मी दररोज रात्री रडत बसायची. मी सतत रडत असे किती रात्र घालवले मलाच माहीत नाही,” असं ती म्हणाली होती.