सिंधुदुर्गनगरी ः आरटीओ प्रकाश काळे यांच्याशी चर्चा करताना परशुराम उपरकर. सोबत सहायक आरटीओ नंदकुमार काळे.pudhari photo
Published on
:
05 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:55 am
कणकवली ः सिंधुदुर्गशी कोल्हापूरला जोडणार्या फोंडाघाट-राधानगरी रस्त्यावरुन 12 टायर, 14 टायर, 20 टायर असलेल्या मल्टी एक्सेल गाड्यांमधून सिलिका वाळू, चिरे यांची पासापेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक होत आहे. मालवण-कणकवली तालुक्यातून होणार्या या ओव्हरलोड आणि विनापरवाना वाहतुकीमुळे फोंडाघाट-राधानगरी रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून रुग्णवाहिकेने रुग्ण नेताना मोठी गैरसोय होत आहे.
शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तातडीने याची दखल घेवून या विनापरवाना वाहतूकीवर कारवाई करावी अन्यथा फोंडाघाट चेकनाक्यावर शिवसैनिक आणि नागरिकांना घेवून आंदोलन केले जाईल असे इशारा वजा निवेदन ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी आ. परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. आरटीओचेही याबाबत त्यांनी लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे की, मागील दोन वर्षापूर्वी सिलिका वाळू, चिरे यांची ओव्हरलोड वाहतूक फोंडा-राधानगरी घाटमार्गे होत असल्याने आंदोलन केल्यानंतर प्रांताधिकार्यांनी फोंडाघाट चेकपोस्टवर भरारी पद्धतीने सर्कलांची नेमणूक केली होती. त्याकाळात काही काळ या वाहतूकीवर नियंत्रण आले होते. पण आता मालवण-तळाशील, कालावल खाडीतून वाळू तसेच याभागात विविध ठिकाणी असलेल्या चिरेखाणी यांची कोल्हापूर-बेळगाव आचरामार्गे कणकवली, फोंडा-राधानगरी येथे ओव्हरलोड विनापरवाना वाहतूक होत आहे. कणकवली पोलिस स्टेशन, कणकवली तहसिलदार आणि प्रांत कार्यालयाच्या हद्दीतूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. याकडे महसूल, पोलिस यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे तर याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आरटीओ प्रकाश काळे यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, राजेश टंकसाळी, समीर परब, संतोष सावंत, श्री. मयेकर आदी उपस्थित होते.